

निरा : पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निरा नदीवरील दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना रविवारी (दि. 18) दुपारी दीडच्या सुमारास निरा नदीच्या पवित्र तीर्थाने स्नान घालण्यात येणार आहे. माउलींचा पालखी सोहळा रविवारी वाल्हे येथील मुक्काम आटोपल्यानंतर निरा येथे दुपारच्या विसाव्याकरिता निरा नदीकाठी सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान येणार आहे. त्यानंतर सोहळा दुपारी दीड वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ होईल.
दरवर्षी निरा गावात माउलींच्या आगमनाच्या आदल्या दिवशी काही दिंड्या जेवण व विश्रांतीकरिता दाखल होतात. त्यामुळे शनिवारपासूनच (दि. 17) माउलींच्या सोहळ्यातील वारकरी दाखल झाले आहेत. त्यामुळे निरेकर नागरिकांची वारकर्यांच्या सेवेसाठी दिवसभर लगबग सुरू होती. काही संतांच्या पालख्याही पुढील मुक्कामाकरिता निरेतून मार्गस्थ होत आहेत.