Ashadhi wari 2023 : ज्ञानोबांच्या वारीसंगे चाले माझ्या संसाराची वारी ; पालखी सोहळ्यात होते हजारोंची उलाढाल | पुढारी

Ashadhi wari 2023 : ज्ञानोबांच्या वारीसंगे चाले माझ्या संसाराची वारी ; पालखी सोहळ्यात होते हजारोंची उलाढाल

समीर भुजबळ : 

वारी संगे चालताना ।
मुखी यावे राम नाम ॥
‘काम’ होता विठ्ठल ।
मिळे समाधान..॥

वाल्हे : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात वारीमध्ये चालताना वेगळी ऊर्जा, प्रेरणा आणि नवसंजीवनी निर्माण होते. वारीसोबत फक्त वारकरी चालत नाहीत, तर वारीसोबत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आपली संसाराची वारी व्यवसाय रूपाने करीत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथून निरेकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात अनेक छोटे व्यावसायिक वारीसोबत चालत असतात. पालखी सोहळा एक महिना चालत असतो.

या सोहळ्यामध्ये रोज लागणार्‍या गोष्टी व इतर साहित्य याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो. यामध्ये पान-फुले विक्रेते, गंध लावणारे, चार्जिंग सुविधा पुरविणारे, चप्पल विक्री व दुरुस्ती, चहा-नाष्टा व पाणी विक्री करणारे, बॅग व चेन दुरुस्ती करणारे, केस कर्तनालय, खेळणी व इतर वस्तू विक्रेते, मसाज दुकाने, शीतपेय दुकाने, चणे, फुटाणे दुकाने अशा विविध पद्धतीचे व्यवसाय वारीमध्ये चालतात.

शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंतचे वारकरी या वारी सोहळ्यात सहाभागी होत असतात. त्यामुळे प्रामुख्याने ज्यांचे लहान व्यवसाय आहेत, ते वारकरी आपला व्यवसाय सोबत घेऊन वारीसोबत चालतात. पती-पत्नी दोघे वारीत हरीनामाचा गजर करत आपल्या संसाराचा गाडा ओढत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे वारीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते.
नित्यनेमाने लागणाऱ्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते, तर दाढी व केस कर्तनालय हे अत्यंत महत्त्वाचे व्यवसाय या वारीदरम्यान चांगल्या पद्धतीने चालतात. मुक्कामाच्या ठिकाणी या व्यवसायास विशेष मागणी असते. इतर सर्वच व्यवसाय हे मुक्कामाच्या ठिकाणी उत्तमप्रकारे चालतात. सासवडमध्ये पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी असल्याने सासवड शहरात आर्थिक व्यवहार झालेले दिसून आले.

Back to top button