कोल्हापूर : ‘शाहूवाडी’त १८ हजार ५६८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप | पुढारी

कोल्हापूर : 'शाहूवाडी'त १८ हजार ५६८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील १८ हजार ५६८ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात आलीत. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प, पेढे देवून करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी दिली.

शाहूवाडी तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेच्या जिल्हा परिषदेच्या २६४ व अनुदानित माध्यमिक शाळा ४८ अशा एकूण ३१२ शाळा आहेत.  गुरुवारी दि १५ रोजी विद्यार्थ्यांना ७६ हजार ७१९ पुस्तकांच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. ही सर्व पुस्तके पं स शिक्षण विभागातून २३ केंद्रातून शाळास्तरावर पोहोच करण्यात आली होती. कामकाजाच्या दृष्टीने केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून केंद्रस्तर ते शाळास्तर पुस्तके वाटपाचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

शासन निर्णयानुसार प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाची रचना चार विभागांत  केली असून, एक सत्र एक पुस्तक याप्रमाणे तीन महिन्यांसाठी एक पुस्तक आहे. या पुस्तकांमध्ये लेखन कार्य करणेसाठी कोरे कागद समाविष्ठ आहेत. जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागतात. दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर कधी एकदा शाळेत जातोय, मित्र मैत्रीणींना भेटतोय, सुट्टीत केलेली मजा सांगतोय, एकत्र डबा खातोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या युनिफॉर्मसोबतच नवे मित्र, नव्या शिक्षकांची भेट होणं. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक उत्साह असतो. दरम्यान पहिलीला प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल आज पडले. शाळांकडून या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.  ‘पुन्हा ते मित्र पुन्हा ती मजा…. पुन्हा त्या नवीन पुस्तकांचा सुगंध… पुन्हा तो शाळेत मिळणारा आनंद”…विद्यार्थ्यांचा किलबिलाट, विद्यार्थ्यांची उत्सुकता, काही नवीन चेहर्‍यांच्या मनात भरलेली धडकी, शिक्षकांना भेटण्याची घाई अशा अतिशय उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात गुरुवारी (दि.१५) शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प, पेढे तर काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले.  पुस्तके चार भागात असून पहिल्या भागाच्या पाठ्यपुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील याचे योग्य नियोजन केले होते.
– जयश्री जाधव, गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी

Back to top button