Kolhapur: ‘त्या’ दाम्पत्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध सुरूच व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबकडे | पुढारी

Kolhapur: 'त्या' दाम्पत्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध सुरूच व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबकडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: वडणगे (ता. करवीर) येथील मधुकर मारुती कदम (५९) आणि जयश्री मधुकर कदम (४९) या दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूचे कारण समजले नाही. त्यांच्या शवचिकित्सा अहवालात मृत्यूचे कारण प्रलंबित ठेवले आहे; तर या दोघांचा व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे. लॅबकडून अहवाल आल्यानंतरच कदम दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

मधुमेहाच्या विकाराचा त्रास असलेल्या कदम दाम्पत्याने बुधवारी सकाळी आयुर्वेदिक औषध घेतले. त्यानंतर काही वेळातच दोघेही बेशुद्ध पडले. सीपीआरमध्ये दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. सीपीआरमधील डॉक्टरांनी शवचिकित्सा अहवाल पोलिसांकडे दिला आहे. मात्र त्यामध्ये मृत्यूचे कारण प्रलंबित ठेवण्यात आले आहे. तपासण्यांचा पुढील अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल, असा उल्लेख त्यामध्ये केला आहे.

दरम्यान, मुक्त सैनिक वसाहत येथील ज्या व्यक्तीने या दाम्पत्याला औषधे दिली त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी कदम यांच्या मुलींनी पोलिसांकडे केल्याचे पोलिस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले.

Back to top button