कोल्हापूर : रंकाळ्यातील मासे मृत | पुढारी

कोल्हापूर : रंकाळ्यातील मासे मृत

कोल्हापूर, पुढारी वृतसेवा : रंकाळा तलावात शुक्रवारी मासे मृत होऊन तरंगताना आढळले. तांबट कमानीच्या बाजूला काठावर तसेच त्यापुढे काही अंतरावर हे मासे आढळले. विशेष म्हणजे हे मृत मासे मोठ्या आकाराचे आहेत. या माशांचा मृत्यू का झाला, याचा शोध महापालिकेचे अधिकारी घेत आहेत. रंकाळ्यातील पाण्याच्या प्रदूषणाची तीव्रता तपासण्यासाठी त्याचे नमुनेही घेण्यात आले आहेत. यामुळे प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावातील जलचरांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरत आहे.

यापूर्वी रंकाळ्यातील पाणी एवढे प्रदूषित झाले होते की, काठावर गेले तरी पाण्याची दुर्गंधी जाणवत होती. प्रदूषणाने टोक गाठले होते. जलपर्णीचा विळखा पडला होता. संपूर्ण तलावभर पसरलेल्या जलपर्णी काढण्याकडे सर्वच यंत्रणांनी दुर्लक्ष केल्यानंतर कोल्हापूरची जनता रस्त्यावर उतरली व जलपर्णी हटविली होती.

आता पुन्हा एकदा रंकाळा तलावातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मृत माशांनी तलावातील पाण्याची गुणवत्ता चव्हाट्यावर आणली आहे. आता तरी यंत्रणा परस्परात समन्वय साधून प्रदूषण दूर करणार का? एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकणार याचे उत्तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना द्यावे लागणार, अशी जनतेची मागणी आहे.

रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी दुधाळीतील प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्यात आले. मात्र, शुक्रवारी सकाळी तांबट कमानीच्या बाजूला काही मोठे मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. स्थानिक नागरिकांनी ही माहिती महापालिका प्रशासनाला कळविली. त्यानंतर महापालिकेचा पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभागाचे अधिकारी येथे आले. त्यांनी मृत मासे बाहेर काढले व त्यांची इतरत्र विल्हेवाट लावली.

आता माशांच्या मृत्यूचा शोध महापालिका पर्यावरण विभाग घेत आहे. त्यांनी पाण्याचे नमुने घेतले आहेत. मासे नेमके कशाने मृत झाले याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. विविध कारणांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. सध्या रंकाळ्यातील पाणी तुलनेने कमी प्रदूषित दिसते. तरीदेखील पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यानंतरच मासे कशाने मृत झाले याबाबतीत बोलणे उचित ठरेल.
– समीर व्याघ्रांबळे, पर्यावरण अभियंता

Back to top button