कोल्हापूर : खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच पतीने फाडले पत्र | पुढारी

कोल्हापूर : खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच पतीने फाडले पत्र

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोपेश्वर मंदिर व परिसरातील स्वच्छताबाबत पुरातत्व खात्याला पाठवण्यात येणाऱ्या पत्राची मासिक सभेत चर्चा सुरू होती. या सभेत सरपंच सारिका कदम यांचे पती कुलदीप कदम यांनी सभागृहात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीचे पत्र काढून घेत थेट फाडून टाकल्याची घटना घडली.

या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य सदस्य इर्शाद मुजावर, अमित कदम यांनी संतप्त होत कुलदीप कदम यांना पत्र फाडल्याचा जाब विचारला. मात्र त्यांना न जुमानता अरेरावीची भाषा वापरली. “तुम्हाला काय करायचे, ते करा” अशी उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर सरपंच आणि पतीने मनमानी कारभार सुरू केला असून सरपंच पतीने केलेल्या कृत्यामुळे गावचे हित दिसून येत नाही, त्यामुळे सरपंच कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ग्रा.प. सदस्य मुजावर आणि कदम यांनी केली आहे.

खिद्रापूर ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी दुपारी 12 वाजता मासिक सभा बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सरपंच सारिका कदम होत्या. सभेच्या प्रारंभी ग्रा.प सदस्य मुजावर आणि कदम यांनी कोपेश्वर मंदिरासमोरील व आवारातील स्वच्छता करण्यासाठी सभेपुढे विषय न ठेवता मासिक मानधन तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती का केली?, पोस्ट ऑफिससाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत डागडुजी करून देण्याचा विषय सभेपुढे का ठेवला नाही? असे विचारत सरपंच आणि पतीने मनमानी कारभार करत असल्याचा आरोप मुजावर आणि कदम यांनी करत बेकायदेशीर केलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली.

सभेत ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर पुरातत्व विभागाच्या निरीक्षकांच्या नावे कोपेश्वर मंदिर व समोरील दर्शनीय भाग व स्टॅन्ड परिसर पुरातत्व खात्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेण्यात यावी अशा मागणीचे पत्र ग्रामसेवक मुल्ला यांनी सही करून सभेपुढे ठेवले होते. सरपंच कदम यांनीही या पत्रावर सही केली होती.

या विषयावर चर्चा सुरू असताना पती कुलदीप कदम यांनी सभागृहात बेकायदेशीर प्रवेश करून समोर ठेवलेले पत्र काढून घेतले. सरपंच कदम यांच्या सहीवर पेनने रेषा मारून खाडाखोड करत पत्र फाडले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. ग्रा.प सदस्य मुजावर आणि कदम यांनी कदम यांना पत्र फाडण्याचा तुम्हाला अधिकार काय ?असा जाब विचारला असता तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे उडवा-उडवीचे उद्धट वर्तन केले.

शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे,सभागृहात बेकायदेशीर प्रवेश करणे, ग्रा.प सदस्यांना दमदाटी करणे या कृत्याची इतिवृत्तात नोंद घेऊन कुलदीप कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली आहे.

कोपेश्वर मंदिरात सरपंच पती कदम यांचे बंधू संदीप कदम हे कर्मचारी आहेत. त्यांच्या भावाला बाहेरची स्वच्छता करावी लागणार या मानसिकतेतून ग्रामपंचायतीच्या पवित्र सभागृहात सरपंच पतीने शिरकाव करून शासकीय पत्र फाडल्याचा आरोप सदस्य मुजावर यांनी केला. शासकीय कामात अडथळा निर्माण करून हुकूमशाही व दांडग्याव्याने मनमानी करणाऱ्या कुलदीप कदम यांचे कृत्य दुपारी 1 वाजून 55 ते अडीच वा. सुमराचे सि.सी.टीव्ही मध्ये कैद झाले आहे.ते पाहून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुजावर यांनी आहे.

कुलदीप कदम यांनी ग्रामपंचायत सभागृहात बेकायदेशीर प्रवेश केला. चर्चा सुरू असताना पुरातत्व खात्याला पाठवण्यात येणारे माझी व सरपंच कदम यांच्या सहीचे पत्र काढून घेत फाडून टाकले. हे कृत्यसंविधानाला अनुसरून नाही याबाबत मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करणार आहे.
ग्रामसेवक आप्पासाहेब मुल्ला.

माझ्या सहीचे पत्र न पाठवता ग्रामसेवकाच्या सहीने पत्र पाठवण्यासठी ते पत्र काढून घेऊन दुसरे पत्र तयार करायला लावले आहे.
-सरपंच सारिका कदम

Back to top button