काळम्मावाडी धरणाचे पाणी लवकरच घरोघरी | पुढारी

काळम्मावाडी धरणाचे पाणी लवकरच घरोघरी

कोल्हापूर. सतीश सरीकर : काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणण्याच्या योजनेतील अत्यंत महत्त्वाच्या कनेक्टिंग पाईपलाईनचे काम सोमवारी पहाटे पूर्ण झाले आणि महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कर्मचारी यांनी स्वप्नपूर्तीचा क्षण अनुभवला. धरणातून जॅकवेलमध्ये पाणी घेण्यासाठी मुख्य पाईपलाईन जोडल्याने कोल्हापूरवासीयांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठ्याचा क्षण जवळ आला आहे. अनेक तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार केलेल्या थेट पाईपलाईनला आता काही दिवसांच्या चाचण्यांची परीक्षा पार करावी लागेल. त्यानंतर काळम्मावाडीचे पाणी शहरातील घराघरांत पोहोचेल.

काळम्मावाडी धरणात तब्बल 140 मीटर लांबीच्या आणि 5 फूट व्यासाच्या कनेक्टिंग पाईपलाईन आहेत. दरवर्षी धरण भरत असल्याने ही पाईपलाईन जोडण्याचे काम रखडले होते. योजना पूर्ण होण्यातील हा मुख्य अडथळा आता पार झाला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काळम्मावाडी धरणातून येणार्‍या पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे.

थेट पाईपलाईन योजनेचे धरण क्षेत्रातच महत्त्वाचे काम होते. धरण क्षेत्रात इंटेक वेल बांधण्यात आली आहे. इंटेक वेलमधून इन्स्पेक्शन वेल-1 व इन्स्पेक्शन वेल-2 हे पाईलपाईनने जोडण्यात आले आहेत. इन्स्पेक्शन वेल-2 पासून वेगवेगळ्या 5 फूट व्यासाच्या दोन पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. या पाईपलाईन इंग्रजी वाय अक्षरासारख्या पसरल्या असून, त्या जॅकवेल क्र. 1 व जॅकवेल क्र. 2 ला जोडल्या आहेत. या पाईपलाईनमधून धरणातील पाणी जॅकवेलमध्ये येईल. त्यानंतर जॅकवेल ते ब—ेक प्रेशर टँकपर्यंत पाईपलाईनद्वारे (रायझिंग मेन) पाणी नेण्यात येणार आहे. ब—ेक प्रेशर टँकमधून पाणी ग्रॅव्हिटीने कोल्हापुरात पुईखडीतील 80 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येईल.

संबंधित बातम्या

कॉपर डॅम काढायला दोन दिवसांत सुरुवात

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना 488 कोटींची आहे. 28 ऑगस्ट 2014 रोजी काम सुरू झाले आहे. योजनेंतर्गत 53 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, योजनेचे महत्त्वाचे काम धरण क्षेत्रातच होते. इंटेक वेल ते जॅकवेलपर्यंतची कामे पूर्ण करण्यासाठी धरणातच तब्बल 150 फूट उंच कॉपर डॅम बांधण्यात आला आहे. परंतु, दरवर्षी पावसामुळे आणि धरणातील पाणीसाठ्यामुळे धरण क्षेत्रातील काम करता येत नव्हते. कॉपर डॅमच्या अलीकडचा भागसुद्धा पूर्णपणे पाण्यात असायचा. पावसाळा संपल्यानंतर जानेवारी-फेब—ुवारीपर्यंत डी वॉटरिंग (मोटार पंपाद्वारे कामाच्या ठिकाणच्या पाण्याचा उपसा करून ते पुन्हा धरणात टाकणे) करावे लागत होते. दरवर्षी ही परिस्थिती असायची. त्यामुळे धरण क्षेत्रात काम करण्यास वेळ कमी मिळत होता. यंदाच्या वर्षी मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरण क्षेत्रातील काम पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेने केला होता. त्यानुसार मे महिना संपण्यापूर्वीच कनेक्टिंग पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसांत कॉपर डॅम फोडण्यास सुरुवात केली जाणार आहे.

Back to top button