कोल्‍हापूर : आंबा-विशाळगड मार्गावर मानोलीतील वनविभागाचा प्रवासी टोल नाका ग्रामस्‍थांनी पाडला बंद | पुढारी

कोल्‍हापूर : आंबा-विशाळगड मार्गावर मानोलीतील वनविभागाचा प्रवासी टोल नाका ग्रामस्‍थांनी पाडला बंद

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा मानोली संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने आंबा-विशाळगड मार्गावरील मानोली धरणाच्या दक्षिण बाजूस रस्त्यावर उभारण्यात आलेला प्रवासी कर नाका अखेर ग्रामस्थ व व्यावसायिकांनी मोर्चा काढून बंद पाडला. वन विभागाने अन्यायी कर उभारल्याने प्रवाशांतून नाराजी पसरली होती. याबाबत मंगळवारी (दि१६) रोजी आंब्यात ग्रामस्थ, व्यावसायिक व वनविभाग यांच्यात संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. मात्र वनविभागाचे कोणीच न फिरकल्याने मोर्चेकरी संतप्त झालेत. त्‍यांनी टोल नाका बंद पाडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मानोली ग्रामपंचायत अंतर्गत सयुंक्त वन व्यवस्थापन समिती व वनपरिक्षेत्र मलकापूर यांच्यातर्फे आंबा-विशाळगड मार्गावरील मानोली धरण परिसरात रस्त्यावर टोल नाका उभारण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी हा टोल नाका सुरू करण्यात आला. कराचे दर आवाच्या सव्वा असल्याने अन्यायी कराच्या निर्णयामुळे पर्यटकांना नाहक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. प्रति मानसी २० व वाहनाला ५० व १०० रुपये कर लावल्याने आंबा, विशाळगड येथील पर्यटनावर याचा परिणाम झाल्याने या कराबाबत असंतोष पसरला होता. हा प्रवासी कर बंद करावा किंवा कराचे दर कमी करावे अशी मागणी पर्यटकांतून होत होती.

कराचे दर सर्वसामान्यांना पर्यटकांना न परवडणारे असल्याने ग्रामस्थ, व्यावसायिकांनी कर वसुलीला विरोध केला होता. टोल बंद करण्याची मागणी होत असतानाही वसुली सुरूच होती. वन विभाग मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचे ग्रामस्थ व व्यावसायिकांच्या लक्षात येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट ग्रामस्थांनी घेऊन कराबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी केली. कराबाबत तोडगा काढण्यासाठी आंब्यात बैठक घेतली, मात्र  बैठकीस वनविभागाचे कोणीच फिरकले नाही. अखेर ग्रामस्थ व व्यावसायिकांनी संतप्त होत टोल नाका तोडून बंद केला.

माजी सरपंच बापू वायकुळ, व्यापारी निलेश कामेरकर, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बाबा गद्रे यांनी तपासणी नाक्यावरील मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी महेंद्र वायकुळ, गारवा रिसॉर्टचे संतोष बागम, कपिल कोलते, वैभव गांधी, योगेश वायकुळ, तात्या बोने, रुपेश वायकुळ, बंडू कोलते, शेखर कोलते, राजाराम आसवले, शिवराज पंतप्रतिनिधी, संजय भोसले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असा होता प्रवासी कर रुपयात

प्रत्येक प्रवासी २०, लहान मुले १०, दुचाकी २०, चारचाकी ५०, मिनीबस १००, मोठी बस २००, शैक्षणिक सहल प्रत्येक व्यक्ती १०, प्लास्टिक बाटली व पिशवी १० आणि गाईड ३०० सध्या तात्पुरता कर बंद करण्यात आला आहे.

मानोली ग्रामपंचायत व वनविभाग यांची बैठक आज (बुधवार) सायंकाळी चार वाजता होईल, प्रवासी कर कमी केला जाईल. यावर योग्य तोडगा काढून प्रवासी टोल नाका सुरू राहणार आहे.

अमित भोसले, परिक्षेत्र वनाधिकारी, मलकापूर

मानोली कर नाका बंद पाडला

हेही वाचा : 

Back to top button