लसीकरण : कोल्हापूर जिल्ह्यात १७ वर्षांपर्यंत ११.८९ लाख मुले | पुढारी

लसीकरण : कोल्हापूर जिल्ह्यात १७ वर्षांपर्यंत ११.८९ लाख मुले

कोल्हापूर; विकास कांबळे : शासनाच्या वतीने 1 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा विचार सुरू आहे. त्याची आरोग्य विभागाच्या वतीने तयारी सुरू केली आहे. या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांची संख्या 11 लाख 89 हजार 577 इतकी आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात आली. प्रथम आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू केले. काही महिन्यांनी 45 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांचा लसीकरणात समावेश करण्यात आला. अलीकडील काळात 18 ते 44 वयोगटातील नागिरकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लहान मुलांना लस देण्यासंदर्भात प्रयोग सुरू होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्य शासन 1 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांनादेखील लस देण्याचा विचार करत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने या वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण सुरू केले होते. यासाठी आरोग्य विभागाीतल कर्मचार्‍यांबरोबरच अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स यांची मदत घेण्यात आली होती. या सर्वेक्षणात एक ते सतरा वयोगटातील 11 लाख 89 हजार 577 मुले आढळून आली. यामध्ये ग्रामीण भागातील मुलांची संख्या 10 लाख 21 हजार 12 तर शहरातील 1 लाख 68 हजार 565 मुलांचा समावेश आहे.

1 ते 17 वयोगटातील मुलांची तालुकानिहाय संख्या

तालुका मुलांची संख्या

आजरा                36,910
भुदरगड              46,149
चंदगड                57,459
गडहिंग्लज           69,279
गगनबावडा          10,979
हातकणंगले       2,47,905
कागल                 84,515
करवीर             1,49,918
पन्हाळा               79,617
राधानगरी            61,294
शाहूवाडी            56,981
शिरोळ             1,20,006
कोल्हापूर शहर  1,68,565

जिल्ह्यातील 1ते 17 वयोगटातील मुलांची संख्या निश्चित झाली आहे. त्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना त्याबाबत आलेल्या नाहीत. सूचना येताच या वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात येईल.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्याधिकारी.

Back to top button