कोल्हापूर : महापालिकेची प्रभाग रचना बदलणार | पुढारी

कोल्हापूर : महापालिकेची प्रभाग रचना बदलणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने 92 सदस्यसंख्या धरून 31 प्रभागांची रचना केली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेबाबत दिलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या बदलून 81 होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना बदलावी लागणार आहे. त्याबरोबरच आरक्षणही बदलले जाईल. राज्य निवडणूक आयोगाकडून त्यासंदर्भात सूचना आल्यानंतर कार्यवाही सुरू होईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्यात जनगणना झाली नसल्याने यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने 2011 च्या लोकसंख्येत अंदाजे वाढ धरून प्रभागांची संख्या वाढविली होती. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली होती. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच प्रभागसंख्या ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्याही पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. लॉकडाऊनमुळे निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार आहे. निवडणूक आयोग आणि राज्य सरकारकडून आलेल्या आदेशानुसार महापालिकेने निवडणूक प्रक्रिया राबविली आहे.

आतापर्यंत तीनवेळा निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि मतदारयाद्यांची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, वेळोवेळी निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी करूनही त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे.

निवडणुकीसाठी 20 किंवा 27 वॉर्ड

महापालिकेची निवडणूक बहुसदस्य पद्धतीने होणार आहे. यापूर्वी महापालिकेने 81 नगरसेवक संख्या धरून त्रिसदस्य वॉर्ड रचना केली होती. त्यानुसार 27 वॉर्ड करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियाही पूर्ण झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या 92 करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 आणि 2 नगरसेवकांचा 1 असे 31 वॉर्ड तयार करून निवडणूक आयोग व राज्य सरकारकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. सध्या चार नगरसेवकांचा एक वॉर्ड होईल, अशीही चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास प्रत्येकी 4 नगरसेवकांचा एक यानुसार 20 वॉर्ड होतील. उर्वरित एका नगरसेवकासाठी स्वतंत्र वॉर्डऐवजी पाच नगरसेवकांचा एक वॉर्ड तयार करण्यात येईल.

Back to top button