कोल्हापूर खड्ड्यातच! | पुढारी

कोल्हापूर खड्ड्यातच!

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरात सुमारे 1 हजार 35 किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. काही वर्षांपूर्वी अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाईन व जलवाहिन्या टाकण्यासाठी सुमारे 500 किलोमीटर रस्ते खोदाई झाली. त्यानंतर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सुमारे 110 किलोमीटर खोदाई करण्यात आली. या सर्व रस्त्यांचे पॅचवर्क किंवा रिस्टोरेशन झालेले नाही. त्यातच आता भूमिगत गॅस पाईपलाईनसाठी पुन्हा 180 किलोमीटर रस्त्यांचे खोदकाम सुरू झाले. यात सुस्थितीतील रस्त्यांचा समावेश आहे. रस्त्यापासून सुमारे 4 फूट खोल आणि दीड फूट रुंद खोदाई होत आहे. परिणामी, कोल्हापूर शहर अक्षरश: ‘खड्ड्यात’ गेले आहे.

अमृत योजनेतून जलवाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या रस्ते खोदाईचेही पॅचवर्क झालेले नाही. सध्या उन्हाळी सुट्टी सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरात भाविक, पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दररोज लाखाच्यावर भाविक, पर्यटक येत असल्याने त्यांच्या वाहनांनी कोल्हापूर गजबजले आहे. त्यातच रस्त्यांच्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचा अनुभव येत आहे. शहरवासीयांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

विकासकामांसाठी खोदाई; पण…

कोणतेही विकासकाम करताना योग्य नियोजन केल्यास नागरिकांना त्याचा त्रास होत नाही. गॅस पाईपलाईन टाकणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधून रस्ते खोदाई करणे आवश्यक आहे. खोदाई झाल्यानंतर तत्काळ काही दिवसांनंतर रिस्टोरेशन गरजेचे आहे. मात्र, शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम गेली दोन-तीन वर्षे सुरू असून, अशाप्रकारे रिस्टोरेशन कुठेच झाल्याचे दिसत नाही. शहरात ई वॉर्डातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

किरकोळ अपघात वाढले

शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई सुरू झाली आहे. अरुंद रस्ते, त्यातच खोदाई आणि त्याचा मुरूम रस्त्यावर, वाहनांची ये-जा यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. खोदाई केलेल्या रस्त्यांवर प्रचंड धूळ आहे. नागरिकांच्या घरांत, दुकानांत धूळ जात आहे. शहरात अनेक रस्त्यांवर स्ट्रीट लाईट नाहीत. अंधारात काहीच दिसत नाही. खोदाई केलेल्या रस्त्यावर खरमाती तशीच असल्याने दुचाकी घसरून किरकोळ अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

महापालिकेची कमाई अन् शहरवासीयांचे हाल

शहरात रस्ते खोदाई करताना महापालिकेला त्यापोटी शुल्क भरावे लागते. त्यांतर्गत गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करणार्‍या कंपनीने 20 कोटी 75 लाख रुपये महापालिका तिजोरीत जमा केले आहेत. परंतु, खोदाईसाठी घेतलेली रक्कम कधीच पॅचवर्क किंवा रिस्टोरेशनसाठी खर्च होत नसल्याचा अनुभव आहे. यंदाही तसेच झाले तर खड्ड्यांचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागणार आहे. महापालिकेने या पैशांतून दर्जेदार रस्ते बनवणे अपेक्षित आहे.

Back to top button