कोल्हापूर : बिद्री साखर कारखाना संस्था गटाचे ठराव दाखल; मंगळवारी यादी प्रसिद्ध होणार | पुढारी

कोल्हापूर : बिद्री साखर कारखाना संस्था गटाचे ठराव दाखल; मंगळवारी यादी प्रसिद्ध होणार

बिद्री: पुढारी वृत्तसेवा: बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी संस्था गटातील मतदानासाठी ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (दि. १७) होती. ‘बिद्री’ साठी संस्था गटाचे १ हजार ६२ संस्था मतदार आहेत. त्यापैकी १ हजार १९ संस्थाचे ठराव दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जमा झालेल्या ठरावांची रात्री उशीरापर्यंत छाननी होणार असून प्रक्रिया पूर्ण करून ती यादी मंगळवारी (दि. १८) प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय निवडणूक विभागाने दिली.

बिद्री साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात संस्था गटाचे ठराव दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती. नव्या सहकार नियमानुसार संस्था गटाचे ठरावधारक मतदार सर्वसाधारण मतदाराप्रमाणेच २५ उमेदवारांना मतदान देण्याचा हक्क निर्माण झाला आहे. पूर्वी संस्था गटातीत उमेदवारांना एकच मत देण्याचा अधिकार होता. त्यामुळे संस्था गटात मोठी चुरस ‘अर्थकारण ‘ होत होते. त्यामुळे संस्थेचे ठराव आपल्याच नावे होण्यासाठी चढाओढ होत होती. तर काही ठिकाणी न्यायालयीन लढाई ही झाल्या होत्या. पण सध्या सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच मतदान केले जाणार आहे. त्यामुळे यातील चढाओढ संपुष्टात आली आहे. शनिवारीपर्यंत केवळ ५५५ ठराव दाखल झाले होते.

सोमवारी ठराव देण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत सुमारे १ हजार १९ ठराव दाखल झाल्याचे छाननी व गणतीपूर्वी दिसून येते. छाननीनंतर मंगळवारी ठरावधारक मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर संस्था गटाची प्रारूप यादी जाहीर होऊन त्यावर हरकती व अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर उत्पादक ‘अ’ वर्ग कच्ची व पक्की मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

हेही वाचा 

Back to top button