कोल्हापूर @ 39, तापमान वाढले; उष्माघाताचा धोका | पुढारी

कोल्हापूर @ 39, तापमान वाढले; उष्माघाताचा धोका

कोल्हापूर; आशिष शिंदे :  सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 39 अंशांवर गेल्याने उन्हाचा जबर तडाखा कोल्हापूरकर सहन करत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार बुधवारी कमाल तापमानात दोन अंशांची वाढ होऊन पारा तब्बल 38.7 अंशांवर स्थिरावला. अचानक वाढलेल्या तापमानामुळे संसर्गजन्य आजारांसह आता उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रत्येक केंद्रात विशेष व्यवस्थादेखील करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरच्या तापमानामध्ये वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35.8 अंशांवर होते. बुधवारी ते 35 वरून पारा 38.7 अंशांवर स्थिरावले आहे. कमाल तापमानातही सरासरी दोन अंशांची वाढ झाली असून, तापमान 24 अंशांवर गेले आहे. तसेच हवेतील आर्दतेचे प्रमाण 69 टक्के असल्याने शहरवासीय घामाघूम होत आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दिवसभर असणार्‍या रखरखत्या उन्हामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत रस्ते ओस पडू लागले आहेत. सिग्नललाही नागरिक सावली बघून थांबत आहेत. पहाटे धुके, दिवसभर रखरखते ऊन आणि सायंकाळी पाचनंतर ढगाळ वातावरणामुळे कोल्हापूरकरांचे आरोग्य बिघडले आहे. येणार्‍या दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूरकरांनो उन्हात फिरताना विशेष काळजी घ्यावी.

वाढत्या तापमानाचा शरीरावर होतो घातक परिणाम

तापमान 37 अंशांपर्यंत असल्यास त्याचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. मात्र, तापमान 37 च्या पुढे गेल्यास वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे घातक परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. तापमान 34 डिग्रीसेल्सियस असेल; पण आर्द्रता 75 टक्के असेल तर तापमान निर्देशांक 49 डिग्रीसेल्सियस इतका असतो म्हणजे व्यक्तीला ते तापमान 42 डिग्रीसेल्सियस इतके त्रासदायक ठरते.

उन्हात यांनी घ्यावी काळजी

  • उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक
  • वृद्धलोक आणि लहानमुले
  • स्थूललोक, पुरेशी झोप न झाल्यास
  • गरोदर
  • महिला व्याधिग्रस्त

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष व्यवस्था

आरोग्य विभागाने तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने हिट अ‍ॅक्शन प्लॅनच्या अनुषंगाने सविस्तर सूचना तयार केल्या असून, त्याची अंमलबजावणी जिल्हा स्तरावर होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सर्व प्राथमिक केंद्रांमध्ये उपलब्ध बेडस्मधील काही बेडस् उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत. तसेच सर्व आरोग्य अधिकार्‍यांना उष्माघाताचे रुग्ण आल्यास ते कसे हाताळावेत यासंदर्भातदेखील प्रशिक्षण देण्यात आले आहे.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. त्वचा लालसर अथवा त्वचेवर फोड आले असतील, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. हाता-पायात गोळे, डोळ्यासमोर अंधारी येत असल्यास सावलीत थांबावे. थोडे-थोडे पाणी प्यावे. तरल पदार्थांचे सेवन जास्त ठेवावे. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यावे. उन्हात बाहेर फिरताना टोपी, छत्री, सनकोट, स्टोल, स्कार्फचा वापर करावा.

उष्माघाताची लक्षणे

 

शरीरावर रॅश उमटणे, हाता पायाला गोळे येणे, चक्कर, ताप, उलटी, पोटात दुखणे, त्वचा लालसर होणे, खूप घाम येणे, थकवा येणे, नाडीचे ठोके मंदावने, डोकेदुखी.

Back to top button