कोल्हापूर : ‘राजाराम’च्या आखाड्यातील ईर्ष्या टोकाला | पुढारी

कोल्हापूर : ‘राजाराम’च्या आखाड्यातील ईर्ष्या टोकाला

कोल्हापूर; विकास कांबळे : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच निर्माण झालेल्या संघर्षावरून या निवडणुकीतील आ. सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यातील टोकाची ईर्ष्या पहावयास मिळाली. मतदानास अद्याप जवळपास महिना बाकी असल्याने आरोप- प्रत्यारोपांनी ‘राजाराम’चे मैदान चांगलेच गाजणार आहे. दरम्यान, उमेदवार अवैधवरून विरोधी आघाडी न्यायालयात दाद मागणार असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडते की नाही, याबाबतच आता साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.

राजाराम साखर कारखान्याची निवडणूक गेल्या चार, पाच वर्षांपासून गाजत आहे. गेल्या तीन दशकांपासून महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चालणार्‍या कारखान्यावर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी आ. सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. गेल्या निवडणुकीत कमी मताच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. निकालानंतर लगेच आ. पाटील यांनी या कारखान्याच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. कारखान्याचे कार्यक्षेत्र 122 गावांमध्ये आहे. कार्यक्षेत्राबोहरील गावातील करण्यात आलेले सभासद अपात्र ठरविण्यासाठी आ. पाटील यांनी न्यायालयीन लढाई दिली. परंतु, यामध्ये त्यांना यश आले नाही. न्यायालयाने सभासद पात्र ठरवल्यामुळे आ. पाटील यांना पहिला झटका बसल्याचे मानले जाते.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत आलेल्या अर्जांची केलेल्या छाननीत आ. पाटील गटाचे 29 अर्ज अवैध ठरविण्यात आले. हा आ. पाटील गटाला दुसरा धक्का असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आक्रमक झालेले आ. पाटील यांनी रडीचा डाव खेळू नका, मर्दासारखे लढा, असे म्हणत महाडिक यांना थेट आव्हान दिले आहे. तसेच यासंदर्भात न्यायालयात जाण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

यावर महाडिक यांनीही मग्रुरीची भाषा राजाराम कारखान्याचे 122 गावांतील सभासद कधीही सहन करणार नाही. आम्ही मैदानातच आहोत. एवढ्यावर मैदान संपलेले नाही, ही फक्त सुरुवात आहे. मग आताच एवढा आकांडतांडव कशाला? असा सवाल केला आहे. आघाडींचे उमेदवार निश्चित होण्यापूर्वी छाननीत दोन्ही गटांमध्ये झालेल्या संघर्षावरून निवडणुकीतील टोकाची ईर्ष्या दिसून येते.

Back to top button