कोल्हापूर : गुटखा, दारू तस्करीत आंतरराज्य रॅकेट | पुढारी

कोल्हापूर : गुटखा, दारू तस्करीत आंतरराज्य रॅकेट

कोल्हापूर, दिलीप भिसे : कर्नाटक, गोव्यासह राजस्थान व मध्य प्रदेशातील सराईत तस्करी टोळ्यांनी सीमा भागासह पुणे-बंगळूर महामार्गावर अक्षरश: कब्जा केला आहे. गुटखा, गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह ड्रग्ज तस्करीचा बेधडक धंदाच सुरू केला आहे. झारीतील शुक्राचार्य व स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या आश्रयाने आंतरराज्य टोळ्या फोफावल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकचे राज्यपाल व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीनंतरही तस्करीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात आंतरराज्य तस्करी टोळ्यांनी थैमान घातले आहे. प्रशासकीय घटकांतर्गत कच्च्या दुव्यांना हाताशी धरून सराईतांनी खुलेआम बाजार मांडला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबादसह मुंबई, पुण्यातही तस्करीचे रॅकेट जोमाने वाढू लागले आहे.

दीड डझन तस्करांवर कारवाया, पुढे काय?

जानेवारी ते 18 मार्च 2023 या काळात महामार्गावर विदेशी दारू व गुटख्याची तस्करी करणार्‍या दीड डझनहून अधिक तस्करांवर कारवाई झाली. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातून गुटख्याची तस्करी करणार्‍या चिक्कोडी तालुक्यातील दोन तस्करांना बेड्या ठोकून कोल्हापूर पोलिसांनी साडेचौदा लाखांचा साठा जप्त केला.

तपास कागदोपत्रीच

गुटख्याची वाहतूक करणार्‍या टेम्पो चालकासह साथीदार जाळ्यात सापडला खरा; पण या तस्करीचा म्होरक्या कोण, गुटख्याची निर्मिती झाली कोठे, संबंधित साठा कोठून कोणाकडे जात होता, स्थानिक तस्करी टोळ्यांचा सहभाग आहे का, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. केवळ कागदोपत्री कारवाईचा धडाका सुरू आहे.

तस्करी टोळ्यांच्या मुळापर्यंत तपास यंत्रणा पोहोचणार का, हा प्रश्न आहे. आजवर तस्करी टोळ्यांच्या किती म्होरक्यांना पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत? निदान वरिष्ठांनी तरी पथकांच्या कामगिरीचा लेखाजोखा तपासावा.

दक्ष (?) पथकांच्या कारवाईचा महिमा किती?
कारवाई झाली… साठ्यांसह दोन-चार संशयित हाताला लागले; पण पुढे काय? पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच काहीशी विचित्र स्थिती आहे. म्हणे, सीमा भागातील तस्करी रोखण्यासाठी रात्रंदिवस पथके कार्यरत आहेत. तरीही गुटखा, दारूची तस्करी होतेच कशी? बरे, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणार्‍या विशेष पथकांनी आजवर किती दारू, गुटख्याचा साठा पकडला, हा कळीचा मुद्दा आहे. पथकांच्या ‘विशेष’ कामगिरीचा आढावा घेणे उचित नाही का?

महामार्गावर गुटखा, विदेशी दारूची रेलचेल

पुणे-बंगळूर महामार्गावर गुटखा, अमली पदार्थांच्या तस्करीसह बनावट दारूची रेलचेल आहे. तस्करीतून कोट्यवधीच्या उलाढाली करणार्‍या कर्नाटक व गोव्यातील सराईत टोळ्यांनी स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून घरपोच सेवा सुरू केली आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, जयसिंगपूर, शहापूर, शिरोळ, वडगाव, गडहिंग्लज, आजरा, मुरगूड, चंदगड परिसरातही तस्करी टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. ओठांवर मिसरूडही न फुटलेली पोरं जीवघेण्या व्यसनांची शिकार ठरू लागली आहेत.

Back to top button