कोल्हापूर : छेडछाडीला आता मुलीच देणार प्रत्त्युतर! | पुढारी

कोल्हापूर : छेडछाडीला आता मुलीच देणार प्रत्त्युतर!

कोल्हापूर, प्रवीण मस्के : समग्र शिक्षांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक 920 शाळांमधील सुमारे 50 हजारांहून अधिक विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत कराटे, किक बॉक्सिंग, बॉक्सिंग या स्व-संरक्षण व जीवन कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच्या माध्यमातून त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे मिळणार असून, त्या छेडछाडीस प्रत्त्युतर देणार आहेत.

राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणांतर्गत सहावी ते बारावीत शिकणार्‍या राज्यातील 20 हजार 259 उच्च प्राथमिक शाळा व 1 हजार 279 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थिनींना गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. आधुनिक युगात विद्यार्थिनी पूर्णपणे सुरक्षित नाहीत, त्यामुळे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण तंत्र यांचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे.

स्व-संरक्षण प्रशिक्षणाद्वारे मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकद़ृष्ट्या पुरेसे सक्षम बनविले जाणार आहे. जेणेकरून त्या संकट, असुरक्षिततेच्या वेळी स्वत:चे संरक्षण करू शकणार आहेत. हिंसाचार करणार्‍यांना संदेश देण्यासाठी मुलींना सक्षम करणे, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुलींना स्वयंकौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यात आत्मविश्वास व जागरूकता विकसित केली जाणार आहे. अनुभवी मार्शल आर्टस् प्रशिक्षकांकडून मुलींना सुरक्षित वातावरणात व्यावहारिक संरक्षण तंत्र शिकवले जाणार आहे. विद्यार्थिनींसाठी उपयुक्त संरक्षण तंत्र कार्यक्रम आत्मनिर्भर बनवून तणाव कमी करण्यासाठीचा उत्तम मार्ग असणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापक त्यासंदर्भातील अहवाल प्राथमिक शिक्षण विभागास देतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.

तायक्वाँदो, वुशू, कराटे, ज्युदो, वेस्टर्न बॉक्सिंग

समग्र शिक्षांतर्गत विद्यार्थिनींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्व-संरक्षण प्रशिक्षण जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात तायक्वाँदो, वुशू, कराटे, ज्युदो, वेस्टर्न बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, मुए थाई, जिऊ-जित्सू (किंवा जुजुत्सु), क्राव मागा, एकिडो, जी कुने डोफोरँड व भारतीय मार्शल आर्ट या स्व-संरक्षण विशिष्ट कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना सेवा पुरवठादाराकडून त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

* आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे स्वरूप
* आत्मसंरक्षण प्रशिक्षण ताणविरहित वातावरणात घ्यावे
* विद्यार्थिनींना शंभर तासांचे मिळणार प्रशिक्षण
* नियमित शिक्षकांचा समन्वयक व प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षणात सहभाग
* ऑनलाईन प्रणाली, एमआयएस टूल व नॉलेज रिपॉझिटरी प्लॅटफॉर्म उपलब्ध

Back to top button