कोल्हापूर : विमान प्रवाशांचा चार लाखांचा टप्पा पार | पुढारी

कोल्हापूर : विमान प्रवाशांचा चार लाखांचा टप्पा पार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळाने चार लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. विमानतळावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या 4 लाख 7 हजारांवर गेली आहे. येत्या शुक्रवार (दि. 13) पासून त्यात आणखी भर पडणार नाही. कोल्हापूर-बंगळूर मार्गावर नवी विमानसेवा सुरू होत आहे.

उडान योजनेंतर्गत 9 डिसेंबर 2018 पासून प्रवासी विमान सेवेला पुन्हा प्रारंभ झाला. यानंतर विमानतळावरील सेवांचा विस्तार होत गेला. कोल्हापुरातून हैदराबाद, बंगळूर, तिरुपती, मुंबई व अहमदाबाद या मार्गावर सेवा सुरू आहे. यामधील मुंबई आणि बंगळूर सेवेत खंड पडला होता. मात्र त्या मार्गावर नव्या कंपनीकडून सेवा सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर-बंगळूर आणि पुढे कोईम्बतूरपर्यंत शुक्रवारपासून विमानसेवा सुरू होत आहे.

कोल्हापूर विमानतळावरून सुरू होणार्‍या सर्वच मार्गांवरील सेवांना प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कोरोना कालावधीतही ‘उडान’ योजनेतील देशातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणार्‍याचा मान कोल्हापूर विमानतळाला मिळाला. डिसेंबर 2019 मध्ये कोल्हापूर विमानतळावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या एक लाखांवर गेली होती. मार्च 2021 मध्ये विमानतळाने दोन लाख प्रवासी संख्येचा टप्पा गाठला. डिसेंबर 2022 मध्ये चार लाख प्रवासी टप्पा पार झाला आहे.

कोल्हापूर-बंगळूर मार्गावर यापूर्वी अलायन्स एअरची सेवा सुरू होती. ती 30 मार्च 2022 पासून बंद झाली. आता इंडिगो कंपनीकडून दररोज सेवा सुरू केली जात आहे. 13 जानेवारी पासून दररोज सांयकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी बंगळूरसाठी विमान टेक ऑफ घेईल. हीच फ्लाईट पुढे कोईम्बतूरपर्यंत जाणार असून बंगळूरबरोबरच कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कोल्हापूर जोडले जाणार
आहे.

लवकरच नव्या मार्गावरही सेवा

कोल्हापुरातून लवकरच अन्य नव्या मार्गावर सेवा सुरू होणार आहेत. कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-दिल्ली, कोल्हापूर-चेन्नई, कोल्हापूर-शिर्डी आदी मार्गावर या सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

Back to top button