कोल्हापूर : गतविजेती दिव्या देशमुख आघाडीवर | पुढारी

कोल्हापूर : गतविजेती दिव्या देशमुख आघाडीवर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे सुरू असणार्‍या 48 व्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीनंतर द्वितीय मानांकित गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख सात गुणांसह आघाडीवर आहे. तर कालपर्यंत आघाडीवर असलेल्या चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डची महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स द्वितीय स्थानावर गेली आहे.

जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारच्या सामन्यात आग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल, आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन (पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्ड), आठवी मानांकित महिला मास्टर औरंगाबादची साक्षी चितलांगे, नववी मानांकित कर्नाटकची महिला मास्टर ईशा शर्मा, अकरावी मानांकित तामिळनाडूची महिला ग्रँडमस्टर श्रीजा शेषाद्री व 40 वी मानांकित तामिळनाडूची सी. संयुक्ता, या सहा जणी सहा गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.

Back to top button