इचलकरंजी, कोरोचीत भटक्या कुत्र्यांचा ३९ जणांना चावा; अल्पवयीन मुलीसह वृद्धा गंभीर जखमी | पुढारी

इचलकरंजी, कोरोचीत भटक्या कुत्र्यांचा ३९ जणांना चावा; अल्पवयीन मुलीसह वृद्धा गंभीर जखमी

इचलकरंजी / कबनूर; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहर व परिसरात तसेच कोरोचीमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडून दोन दिवसांत तब्बल 39 जणांचा चावा घेऊन जखमी केले आहे. यामध्ये महादेवी रुद्राप्पा कोष्टी (वय 68, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी) ही वृद्धा आणि घराजवळ खेळणार्‍या आरोही कुमार आडेकर (8, रा. कोरोची, ता. हातकणंगले) या अल्पवयीन मुलीच्या चेहर्‍याचे लचके तोडले आहेत. अन्य 11 जखमींवर इंदिरा गांधी इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अनेक वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरूच आहे. महापालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे यात भरच पडली आहे. गत दोन दिवसांत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालत भारतमाता हौसिंग सोसायटी, सूर्योदयनगर आदी परिसरात अनेक नागरिकांचा चावा घेतला. महादेवी कोष्टी या कपडे वाळत घालत होत्या. कुत्र्याने त्यांच्या गालाचे आणि खांद्याचे लचके तोडले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या; तर आरोहीच्या कपाळाचा कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये तिला तब्बल 30 टाके पडले. दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव बचावला. दोघींना इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

याबरोबरच कुत्र्यांनी जवाहरनगर, गंगानगर, शेळके मळा, सूर्योदयनगर, भारतमाता हौसिंग सोसायटी, बरगे मळा, तारदाळ आदी ठिकाणीही अनेकांचा चावा घेतल्याचे प्रकार घडले आहेत. यापैकी तब्बल 20 जणांवर दोन दिवसांत इंदिरा गांधी इस्पितळात बाह्य उपचार करण्यात आले आहेत.

कोरोची परिसरातील विवेकानंदनगर, हाळवणकर कारखान्याशेजारील रस्त्यावरून जाणार्‍या दोन महिलांना आणि लहान मुलांचा कुत्र्यांनी चावा घेतला.

दरम्यान, अज्ञातांनी बाहेर गावाहून पकडलेली मोकाट कुत्री कोरोची गावच्या हद्दीत आणून सोडण्याचे प्रकार दिसून येत आहेत. याकडे कोरोची ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

अधिक वाचा :

Back to top button