कोल्हापूर : उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थिनीचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थिनीचा मृत्यू

शित्तूर वारुण (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : उदगिरीपैकी केदारलिंगवाडी (ता. शाहूवाडी) येेथील पुसार्ले धनगरवाड्यातील मनीषा रामू ऊर्फ राया डोईफोडे (वय 10) हिच्यावर बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले. बुधवारी (दि. 21) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

चौथीत शिकणारी मनीषा जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेली होती. यावेळी झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने मनीषावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याने तिच्या गळ्याचा चावा घेतल्याने तिच्या गळ्यावर व चेहर्‍यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या तीव— जखमा दिसून येत होत्या. ही घटना परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने घटनास्थळावर प्रचंड गर्दी झाली. घटनास्थळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा अक्षरश: हृदय पिळवटून टाकणारा होता.

वन विभागाचे कर्मचारी प्रदीप वाडे, बळवंत बनसोडे यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा केला व पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविला.

ठोस बंदोबस्त होणार का?

चांदोली अभयारण्यालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा खुलेआमपणे वावर आहे. तो नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. याआधी दोन-तीन महिन्यांपूर्वीच उखळू येथे शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता. अतिदक्षता विभागातील उपचारांनंतर तो कसाबसा वाचला. यावेळी मात्र बिबट्याच्या हल्ल्यात ही मुलगी जीवानिशी गेली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे. मात्र, आर्थिक मदतीशिवाय वन विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. हेच या डोंगररानात राहणार्‍या ग्रामस्थांचे दुर्दैव आहे.

अधिक वाचा :

Back to top button