कोल्हापूर : दारू तस्करांचे यंत्रणांना ‘ओपन चॅलेंज; थर्टी फर्स्टच्या तोंडावर रोज कोट्यवधीची उलाढाल | पुढारी

कोल्हापूर : दारू तस्करांचे यंत्रणांना 'ओपन चॅलेंज; थर्टी फर्स्टच्या तोंडावर रोज कोट्यवधीची उलाढाल

कोल्हापूर;  दिलीप भिसे :  कुख्यात तस्करांसह संघटित टोळ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह गोव्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठका होत असतानाही कमाईला सोकावलेल्या दारू तस्करांनी प्रशासकीय यंत्रणांना खुले आव्हान दिले आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा भेदून तस्करांनी महामार्गांसह चोरट्या मार्गांवरून दारूची खुलेआम तस्करी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा, विदर्भ, राजस्थान, बिहार, गुजरात, आंध्रातील आंतरराज्य तस्करी टोळ्या सक्रिय आहेत. प्रशासनातील कच्च्या दुव्यांसह स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून सराईतांनी सुरक्षा यंत्रणा भेदून काढल्या आहेत.

केवळ जुजबी, कागदोपत्री कारवाई!

देशी-विदेशी दारूची बेधडक तस्करी करणाऱ्या १ हजार ५७२ तस्करांना बेड्या ठोकून देशी-विदेशी दारूसह ४ कोटी ८६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असला, तरी तस्करांचे कारनामे काही थांबलेले नाहीत. महामार्गावर रात्रंदिवस नाकाबंदी करूनही अवघ्या दीड- दोन महिन्यात सव्वा कोटीचा दारूसाठा हाताला लागला आहे. नाकाबंदी, वाहन ” तपासणी केवळ कागदोपत्री सुरू आहे का ? असाही प्रश्न सामान्यांना पडू लागला आहे. जिल्ह्यात प्रत्येक वर्षाला कोट्यवधीची दारू हस्तगत केली जाते. पंटर्सना बेड्या ठोकल्या जातात. दारूची नेमकी तस्करी कोठून होते? याची आजतागायत पोलखोल झालेली नाही. मास्टरमाईंड अजूनही मोकाटच आहेत…

दारू तस्करीतील उलाढालीचा टक्का वाढला!

जानेवारी – डिसेंबर २०२१ वर्षाच्या तुलनेत जानेवारी २०२२ ते दि. १० नोंव्हेबर २०२२ या काळात दारू तस्करीच्या गुन्ह्यात ७३ ने वाढ झाल्याचे दिसून येते. गतवर्षी १,६८०, यंदा १,७६२ तस्करीचे गुन्हे रेकॉर्डवर आले आहेत. शिवाय, अटक करण्यात आलेल्या तस्करांच्या संख्येतही ३२४ ने वाढ झाली आहे. गतवर्षी १,२४८, चालू वर्षात १,५७२ तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गतवर्षाच्या तुलनेत २०२२ काळात ९५ लाख ८२ हजार ३३९ रुपये किमतीचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

गडहिंग्लज, कागल, इचलकरंजी तस्करीत अव्वल

गतवर्षाच्या तुलनेत यंदा म्हणजे २०२२ काळात जिल्ह्यांतर्गत गडहिंग्लज, शाहूवाडी, कागल व इचलकरंजी विभागांत दारू तस्करीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून येते. गुन्ह्यांची कंसातील आकडेवारी चालू वर्षातील : कोल्हापूर शहर एकूण गुन्हे १२८ (१५८), शाहूवाडी- २४१ (२५२), हातकणंगले – १९९ (२१२), इचलकरंजी २५५ (२६४), कागल- २१६ (२३१), – गडहिंग्लज- २४६ (२४२).

2021 मधील गुन्हे

  • एकूण गुन्हे – 1,689
  • वारस गुन्हे – 1,217
  • बेवारस – 472
  • आरोपी अटक – 1,248
  • जप्त वाहने – 133
    जप्त मुद्देमाल 3,90,39,882

2022 मधील गुन्हे

  •  एकूण गुन्हे – 1,762 
  •  वारस गुन्हे – 1,431
  • बेवारस –        331
  • आरोपी अटक – 1,572
  • जप्त वाहने –  139
  •  जप्त मुद्देमाल  – 4,86,22,221

 

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात सहाही विभागांतर्गत नाकाबंदी, संशयास्पद वाहनांची तपासणी तसेच छुप्या अड्यांवर छापासत्राची मोहीम रात्रंदिवस सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे चालू वर्षात राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने १,५७२ तस्करांना बेड्या ठोकून सुमारे ४ कोटी ८६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

-रवींद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर

 

Back to top button