शिवरायांच्या चरित्राचा डोळसपणे अभ्यास व्हावा- विश्वास पाटील

शिवरायांच्या चरित्राचा डोळसपणे अभ्यास व्हावा- विश्वास पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय,' असे म्हणत आपण शिवजयंती साजरी करतो. जल्लोषी मिरवणूकही काढतो; मात्र त्यातून शिवसंदेश घरोघरी पोहोचवतो का, असा सवाल करत छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा डोळसपणे अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक, निवृत्त सनदी अधिकारी, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. विधात्याने औरंगजेबसारख्या पाप्याला 89 वर्षांचे आयुष्य दिले; मात्र शिवरायांना केवळ 18 हजार 306 दिवसांचे आयुष्य दिले. परमेश्वराने आपल्या भूमीवर अन्यायच केला. मात्र, अवघ्या 49 वर्षांच्या या आयुष्यातही चार-चार शतके पुरेल इतका महापराक्रम त्यांनी केला. आणखी दहा वर्षांचे जरी आयुष्य मिळाले असते, तरी छत्रपती शिवरायांनी भीमा, निराकाठची घोडी, इंग्लंड आणि फ्रान्सच्या समुद्रकाठी नाचवली असती, असे सांगत, शिवरायांचे रूप आठवावे, प्रताप आठवावा, त्यांचे चरित्र विवेक पद्धतीने तरुणांत साठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित 'पुढारी'कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाचे औचित्य साधत 'छत्रपती शिवरायांचे असामान्य जीवन आणि कर्तृत्व' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. व्यासपीठावर शाहू महाराज, दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. 'पुढारी'चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. तरुण-तरुणींसह आबालवृद्धांच्या अलोट गर्दीने शाहू स्मारक भवन खचाखच भरले होते. सभागृहाबाहेरही लावलेल्या स्क्रीनसमोर श्रोत्यांची गर्दी होती.

पाटील यांनी युगपुरुष छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा आणि जाज्वल्य इतिहास विविध प्रसंग व संदर्भांसह आपल्या खास शैलीत उलगडला. एका बखरीत शिवरायांचे 22 गुरू सांगितले. मात्र, शहाजीराजे हेच शिवरायांचे महागुरू होते, असे सांगत पाटील म्हणाले, खरे शहाजीराजे आपल्याला कधी शिकवलेच नाहीत. त्यांची वृत्ती स्थिर नव्हती, असे सांगितले जाते. मात्र, लाखोंच्या फौजेसमोर लढणारा शूरवीर, भातवडीच्या युद्धात प्रथम गनिमी कावा वापरणारे शहाजीराजे कधी शिकवले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज निसर्गपुत्र होते, असे सांगत पाटील म्हणाले, त्यांना नदी, डोंगर, वाटा-पायवाटा यांची माहिती होती. याचा त्यांनी स्वराज्य उभारणीत उपयोग केला. छत्रपती शिवरायांची दिव्यद़ृष्टी पारखी होती. शिवराय एक व्यक्ती नसून, त्यांच्या अंगी आठ माणसे काम करीत होती. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्यासारखे अनेक सरदार घडवले. नेताजी पालकर हे त्यापैकी एक पेटता निखारा होते.

छत्रपती शिवराय हे अष्टावधानी होते, ते इस्लामविरोधी नव्हते, अनेक मुस्लिम सरदारांनी छत्रपती शिवरायांना मदत केली, असे सांगत पाटील म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांचा राजकारण्यांनी चलती नाणे म्हणून वापर केला आहे. विधानसभेच्या आवारात आता कुठे छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. मात्र, तोही छोटा आहे. राजमुकुटाचे वाटोळे केले, असे सांगत ते पुढे म्हणाले, प्रफुल्लित होऊन महाराजांच्या जिरेटोपाशी खेळू नका, नाही तर हात जळतील.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. विश्वास पाटील यांनी अधिकाधिक व्याख्यानाच्या माध्यमातून हे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावेत. शिवाजी विद्यापीठात गेली 34 वर्षे डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमाला अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेत संत साहित्यापासून पर्यावरणापर्यंत तसेच सामाजिक विषयापासून अर्थशास्त्रापर्यंत आदी विविध विषयांवरील व्याख्यानांच्या माध्यमातून जनतेस वैचारिक मेजवानी दिली आहे. दै. 'पुढारी'चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. तोच वारसा डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुढे चालविला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विकासाच्या वाटचालीत दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे.

डॉ. शिर्के म्हणाले, देशात प्रथमच पत्रकारितेतील अध्यासन सुरू करण्याचा मान शिवाजी विद्यापीठास मिळाला आहे. त्याचे सर्व श्रेय डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आहे. अध्यासनाच्या उभारणीसह मार्गदर्शन केले. केवळ मार्गदर्शन करून न थांबता डॉ. जाधव यांनी मोठे पाठबळ दिले आहे. त्यामुळेच आज शिवाजी विद्यापीठाच्या आवारात सात कोटी रुपये खर्चातून अध्यासनाची अद्ययावत इमारत साकारली आहे. विश्वास पाटील यांनी संशोधनातून छत्रपती शिवरायांसंदर्भात केलेल्या अभ्यासामुळे त्यांना अधिकारवाणीने बोलण्याचा हक्क आहे. त्यामुळेच ते आपल्या भाषणात मी हे सिद्ध करून दाखवू शकतो, असे छातीठोकपणे सांगत आहेत. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. व्याख्यानमालेचे संयोजन पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे, सहायक कुलसचिव आर. आय. शेख यांनी केले.

जाधव मंडळींचे इतिहासात मोठे योगदान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जाधव मंडळींचे मोठे योगदान राहिले आहे. अचलोजी, संताजी यांच्याबरोबर पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांच्यासमवेत लढणारे शंभूजी जाधव युद्धात कामी आले. जाधवांच्या अनेक पिढ्या स्वराज्याच्या कामी आल्या, हे इतिहासातील वास्तव असल्याचे विश्वास पाटील म्हणाले.

डॉ. प्रतापसिंह जाधव शिवविचाराने झपाटलेले

विद्यार्थिदशेपासून आपण डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या शिवप्रेमाशी परिचित आहोत. शिवविचाराने झपाटलेले हे व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गार विश्वास पाटील यांनी काढले. डॉ. जाधव यांनी सर्वप्रथम इंग्लंडच्या अल्बर्ट म्युझियमशी पत्रव्यवहार करून छत्रपती शिवरायांनी वापरलेली तलवार आणि वाघनखांची छायाचित्रे मागवून 'पुढारी'तून प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी आपल्या परीने ही तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाटील यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारे राज्यात 7 हजार संशोधक

छत्रपती शिवाजी महाराज यांना 49 वर्षांचे आयुष्य लाभले. या कालावधीत त्यांनी विपुल असे कार्य केले. शिवाजी महाराजांचे कार्य व मराठेशाहीचा अभ्यास करणारे राज्यात सुमारे सात हजार संशोधक आहेत. त्यांच्याकडून महाराजांच्या कार्याची अफाट माहिती जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

कागल-कोल्हापूर परिसरात रणसंग्राम

छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला. यानंतर मुस्लिम राजे 'शिवाजी महाराज मैदानावरची लढाई लढत नाहीत, ती डोंगरदर्‍यात लढाई करतात', असे म्हणत होते. त्यावेळी छत्रपती शिवराय आताचे कागल ते कोल्हापूर या परिसरात मैदानावर दहा हजारांच्या शत्रूच्या फौजेवर चालून गेले आणि त्यांना पळवून लावल्याचेही पाटील यांनी सांगितले.

राज्यव्यवहार कोष निर्माण करण्याची गरज

राजकीय व्यवहारात आज या ठिकाणी – त्या ठिकाणी हे शब्द सर्रास वापरले जात असल्याचे सांगत विश्वास पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यव्यवहार कोष निर्माण केल्याची आठवण करून दिली. आज नव्याने राज्यव्यवहार कोष निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी सोहळ्यासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा पुढाकार

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक त्रिशताब्दी सोहळा साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळेस महापालिकेत बैठक घेऊन विविध राजकीय पक्ष, तालीम मंडळांकडून लोकोत्सव साजरा केला. राजर्षी शाहू जन्मशताब्दीचा सोहळा डॉ. जाधव यांनी बारकाईने लक्ष घालून नियोजन करून उत्साहात साजरा केला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्याशी चर्चा करून या सोहळ्यास राज्यव्यापी स्वरूप दिले. शासकीय पातळीवर शाहू जयंती साजरी करण्याचा निर्णय डॉ. जाधव यांनी घेतला आणि त्याची अंमलबजावणीदेखील सरकारकडून करून घेतली. राजर्षी शाहू स्मारकाची उभारणी डॉ. जाधव यांच्याच प्रयत्नातून झाल्याचे प्रास्ताविकात शिवाजी विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी सांगितले.

वेडात दौडले वीर मराठे सात

पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इस्लामला विरोध नव्हता. त्यांची तत्कालीन जहांगीरदार यांना मदत असायची. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक फौजदार हे मुस्लिम होते. वेडात दौडले वीर मराठे सात यामध्ये एक मुस्लिम सरदार होता, असेही त्यांनी सांगितले.

सभागृहात नीरव शांतता

विश्वास पाटील यांचे व्याख्यान आणि ते छत्रपती शिवरायांचे कार्यकर्तृत्व या विषयावर असल्याने सभागृह खचाखच भरले होते. पाटील यांचे भाषण सुरू होताच सभागृह नि:शब्द झाले. सुमारे एक तासाहून अधिक काळ भाषण सुरू असतानाही सभागृहातील एकाही व्यक्तीने हालचाल केली नाही. भाषणाचा शेवट होईपर्यंत सभागृहात नीरव शांतता होती.

एकदा तरी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा

विद्यार्थी आज कोणत्या धामला जाऊ, अशी विचारणा करत असतात. त्यांनी जीवनात एकदा तरी रायगड चढून, छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

छत्रपतींना मुजरा करण्यासाठीच रायगडावर वीज कोसळली!

2005 च्या पावसाळ्यात रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीवर वीज कोसळली. तेव्हा आपण मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. भर पावसात अलिबाग ते रायगड असा सहा तासांचा प्रवास करून पोहोचलो. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी रायगडावर समाधिस्थळीच वीज का कोसळत असावी, अशी विचारणा केली. त्यावर मानवतेचा विचार पुण्यभूमीत रुजवणार्‍या छत्रपतींना मुजरा म्हणून गेल्या 20 वर्षांत पाचवेळा शिवरायांच्या समाधीवर वीज कोसळल्याचे आपण सांगितले, असेही पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news