कोल्हापूर : गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी | पुढारी

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोव्यातून गगनबावडामार्गे शहर, जिल्ह्यात विदेशी दारूची तस्करी करणार्‍या कोल्हापूर येथील स्थानिक टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छडा लावला. तस्करी करणार्‍या टेम्पोचा पाठलाग करून 19 लाख 20 हजार रुपये किमतीचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला आहे. संशयित म्होरक्या गजानन दिनकर पाटील (वय 38, रा. रूईकर कॉलनी, कोल्हापूर) हा पसार झाला आहे.

संशयिताच्या शोधासाठी राज्य उत्पादन शुल्कची दोन पथके गोव्यासह सिंधुदुर्ग व बेळगावला रवाना करण्यात आली आहेत. तस्करी टोळीच्या म्होरक्यासह सराईत लवकरच हाताला लागतील, असे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले. संशयित गजानन पाटीलविरुद्ध कोल्हापुरात तीन, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी एका गुन्ह्याचे रेकॉर्ड आहे. हस्तगत करण्यात आलेला टेम्पो यापूर्वीही तस्करीच्या एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आला होता.

टेम्पोचा थरारक पाठलाग!

गोवा येथून दोन टेम्पोंमधून गोवा बनावटीच्या विदेशी दारूची कोल्हापूरच्या दिशेने तस्करी होत असल्याची माहिती मिळताच भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांच्या पथकाने गगनबावडा येथे नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली. पथकाची नजर चुकवून दोन्हीही वाहने कोल्हापूरच्या दिशेने भरधाव निघाली. त्यापैकी एका टेम्पोचा क्रमांक पथकाला मिळाला. भरारी पथकाने टेम्पोचा पाठलाग सुरू केला.

टेम्पो अंधारात सोडून पलायन

तस्करी करणारा टेम्पो शहरात आल्यानंतर न्यू शाहूपुरी परिसरात बसंत-बहार चित्रपटगृहाच्या दिशेने अंधारात आडोशाला गेला. भरारी पथकातील अधिकारी, जवान पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास येताच म्होरक्यासह चालक व अन्य साथीदार विदेशी दारूच्या बॉक्सने भरलेला टेम्पो रस्त्यावर सोडून पसार झाले. पहाटेला पथकाला टेम्पोचा सुगावा लागल्यानंतर त्यामधील दारूसाठा हस्तगत करण्यात आला, असे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

म्होरक्याविरुद्ध ‘एनपीडीए’चा प्रस्ताव

संशयित गजानन ऊर्फ गज्या पाटीलविरुद्ध तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध ‘एनपीडीए’च्या कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात येईल, असेही आवळे म्हणाले.

101 दारू तस्करांना जिल्ह्यात बेड्या

गोवा व कर्नाटकातून कोल्हापूर शहर, जिल्ह्यात होणार्‍या दारू तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने जानेवारी ते 4 डिसेंबर या काळात प्रभावी कारवाई केली आहे, असा अधीक्षक आवळे यांनी दावा केला आहे. म्होरक्यांसह 101 दारू तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 84 गुन्हे दाखल करून 2 कोटी 77 लाख 44 हजारांचा दारूसाठाही हस्तगत करण्यात आला आहे. 44 वाहने ताब्यात घेण्यात आल्याचेही रवींद्र आवळे यांनी सांगितले.

Back to top button