कोल्हापूर : अकिवाट येथील जवान शितल कोळी यांचे अपघाती निधन | पुढारी

कोल्हापूर : अकिवाट येथील जवान शितल कोळी यांचे अपघाती निधन

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : अकीवाट (ता.शिरोळ) येथील जवान शितल कल्लाप्पा कोळी (वय २९) यांचे मजरेवाडी (ता. शिरोळ) जवळ अपघाती निधन झाले. ते सैन्यातील १५ मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. विशेष म्हणजे १० दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला आहे. यामुळे ते १८ तारखेला अकिवाट येथे गावी आले होते. मुलाला पाहण्यासाठी ते सांगली जिल्ह्यातील माळवाडी – सावळवाडी येथे सासरवाडीत गेले होते. मात्र गावी परतत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. कोळी कुटुंबात एकीकडे मुलगा झाल्याचा आनंद साजरा होत असताना शितल यांच्या मृत्यूने कुटुंब शोकसागारात बुडाले.

जवान शीतल कोळी हे ८ वर्षापासून सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते. १५ मराठा बटालियनमध्ये ते ढाना मध्यप्रदेश येथे देशसेवा बजावत होते. त्यांना एक दोन वर्षांचा मुलगा आहे. शुक्रवारी दिवसभर ते पत्नी व नवजात मुलासमवेत वेळ घालवला. यानंतर ते शनिवारी कामावर हजर होणार असल्यामुळे त्यांनी शुक्रवारी मिरज रेल्वे स्टेशन येथून रेल्वेचे तिकीट बुकिंग करून अकीवाटकडे आपल्या गावी परतत होते.

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कुरुंदवाड मजरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर आणि मोटर सायकलची धडक होऊन ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादम्यान सांगली येथील शासकीय रुग्णालयात शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचे पार्थिव अकिवाट येथे आणण्यात आले.

बेळगावी येथील आर्मी पथकाकडून मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी  नायब तहसीलदार योगेश जमदाडे, सपोनि बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सरपंच विशाल चौगुले आदी उपस्थित होते. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे अकिवाट व परिरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, विवाहित बहीण व २ मुले आहेत.

अधिक वाचा :

Back to top button