अन्यायी कामगार कायद्याविरोधात संघर्षाला तयार राहा : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

अन्यायी कामगार कायद्याविरोधात संघर्षाला तयार राहा : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचे रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोधच आहे. केंद्र सरकारच्या अन्यायी कामगार कायद्यांविरोधात रस्त्यावरील लढाईची तयारी ठेवा, असे आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी केले.

आयटकच्या 19 व्या राज्य अधिवेशनास शुक्रवारपासून येथे सुरुवात झाली. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयटकचे प्रदेश अध्यक्ष सी. एन. देशमुख होते.

कामगारविरोधी धोरण ठरवून उद्योगपतींना लाल कार्पेट अंथरून गुंतवणुकीचे नाटक करायचे, अशा प्रकारचे उद्योग सुरू आहेत. गुंतवणुकीसाठी आकर्षक सवलती देण्याबद्दल हरकत नाही. परंतु कामगारांचे रक्त शोषून करण्यात येणार्‍या गुंतवणुकीला आमचा विरोध आहे. नव्या कामगार कायद्यामुळे कायम सेवेतील कामगार ही संकल्पनाच बंद झाली आहे. याच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. नाही तर दैनिक वेतन, फिक्स पगार आणि कंत्राटी कामगार एवढे तीनच प्रकार शिल्लक राहतील. राज्यातील 11 कोटी लोकसंख्येपैकी 5 कोटी कामगार या संज्ञेखाली येतात. त्यातील 80 लाख कामगार संघटित व संरक्षित आहेत. सव्वाचार कोटी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यंत्रमाग कामगार, ड्रायव्हर, घरेलू कामगार व शेतमजूर कल्याणकारी मंडळाचा मसुदा तयार आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले.

सत्तेचा मोह न ठेवता कष्टकर्‍यांसाठी काम करणार्‍यांना सलाम

कोणत्याही सत्तेचा मोह न ठेवता लाल बावटा घेऊन कार्यकर्ते प्राामणिकपणे लढत आहेत. त्यांच्यामुळेच कष्टकरी, कामगारांना न्याय मिळतो. ते नसते तर समाजातील शोषित, पीडित, वंचित, कष्टकर्‍यांना कोणी वालीच राहिला नसता. अशा कार्यकर्त्यांना मी सलाम करतो, असे आ. हसन मुश्रीफ म्हणाले.

कामगारांच्या लढ्यामुळे मिळालेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात आणले जात आहेत. कामगार विषयक 29 कायदे आहेत. त्याच्या ऐवजी केवळ चारच नवीन कायदे करण्यात येत आहेत. हे कामगार विरोधी आहेत. त्यामुळे यापुढे स्थानिक पातळीवरील खासदार, आमदार यांच्या निवासस्थानावर मोर्चे काढून त्यांना नवीन कामगार कायद्याबाबत जाब विचारला पाहिजे, असे आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले यांनी सांगितले. डॉ. सुभाष जाधव यांनी, कामगारांच्या प्रश्नांसाठी व्यापक एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी मिलिंद रानडे, भाकपचे प्रदेश सरचिटणीस सुभाष लांडे यांची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात सी. एन. देशमुख यांनी राज्यघटना मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपल्या प्रश्नांबरोबर कामगारांनी सामाजिक प्रश्नांवर देखील एकत्र आले पाहिजे. त्याकरिता कामगारांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कॉ. दिलीप पवार यांनी स्वागत केले. आयटकचे प्रदेश सरचिटणीस श्याम काळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मोहन शर्मा, बाबुराव कदम, श्रीराम भिसे, अनिल लवेकर, बबली रावत, सतिशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते. आयटकचे जिल्हाध्यक्ष एस. बी. पाटील यांनी आभार मानले. सदाशिव निकम यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button