कोल्हापूर : ‘डिजिटल’द्वारे विद्यार्थ्यांची वाटचाल ‘हायटेक’ शिक्षणाकडे | पुढारी

कोल्हापूर : ‘डिजिटल’द्वारे विद्यार्थ्यांची वाटचाल ‘हायटेक’ शिक्षणाकडे

कोल्हापूर, प्रवीण मस्के : शाळा म्हटले की, युनिफॉर्म घालून बसची वाट पाहत कंटाळलेल्या चेहर्‍यांनी जाणारी लहान मुले दिसतात. आता तीच मुले लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेली दिसतात. कोरोना संकटात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले. डिजिटल म्हणजेच ऑनलाईन शाळा ही त्यापैकीच एक आहे. याच्या माध्यमातून आज विद्यार्थी ‘हायटेक’ शिक्षणाची वाटचाल करीत आहेत.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मौलाना आझाद यांच्या भारतीय शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी 2008 पासून दरवर्षी हा दिन साजरा करण्यात येतो. देशातील विद्यार्थ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे जगभरातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. परिणामी, चार भिंतीच्या शाळेची जागा एका स्मार्टफोनने घेतली. सामान्य कुटुंबातील लाखो विद्यार्थ्यांचे या बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे मोठे नुकसान झाले. यानिमित्ताने आरोग्य व शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षे मुलांना शाळेची पायरी चढता आली नाही. घरात बसूनच ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवावे लागले. एका सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात स्मार्टफोन बाळगणार्‍या शालेय विद्यार्थ्यांची संख्या 2020 मध्ये 61.8 टक्के होती. यात झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. ऑनलाईन प्रणालीचा वापराने ग्रामीण व शहरी भागातील डिजिटल तफावत कमी होऊन शैक्षणिक असमानतेमध्ये घट झाल्याचे सर्वेक्षणात आढळले. मात्र, सामान्य कुटुंबातील स्मार्टफोन उपलब्ध नसणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.

पीएम-ई-विद्या या दिशेने टाकलेले डिजिटल, ऑनलाईन, ऑन-एअर शिक्षण यांच्याशी संबंधित सर्व प्रयत्नांचे एकीकरण करणारे आणि विद्यार्थी, शिक्षक यांना समान पातळीवर शिक्षण उपलब्ध करणारे एक महत्त्वाचे सर्वसमावेशक पाऊल ठरले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून ऑनलाईन अध्ययनास प्रोत्साहन देण्यासाठी समग्र शिक्षा योजनेंतर्गत ऑनलाईन शिक्षण, प्रशिक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. नववी ते पदवीपर्यंतच्या कोट्यवधी विद्यार्थ्यांनी ‘स्वयंम’ ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. राज्य सरकारने सुरू केलेले ‘दीक्षा’ अ‍ॅप रीड-टू-मी, यू-ट्यूब चॅनेलचा शिक्षणात वापर सुरू झाला आहे. तो आजअखेर सुरूच आहे.

पुढील दशकात भारत जगात सर्वात तरुण देश!

पुढील दशकात भारतात जगातील सर्वात जास्त युवा लोकसंख्या असेल, असे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षण अहवालात नोंदविले आहे. त्यामुळे त्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिला आहे. शैक्षणिक धोरणात अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या आहेत. अलीकडेच कौशल्य विकासास सरकारने प्राधान्य दिले असून, प्रधानमंत्री कौशल विकास योजना 3.0 सुरू केली आहे. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाचे सामान्य शिक्षणात एकात्मिकीकरण केल्याने चालना मिळाली आहे.

Back to top button