राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत | पुढारी

राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत

उजळाईवाडी, पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर शुक्रवारी स्वागत करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, दै.‘पुढारी’चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यपाल आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी राज्यपाल कोश्यारी शुक्रवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते.

सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी त्यांचे विशेष विमानाने येथे आगमन झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ संचालक अनिल शिंदे, करवीर तहसीलदार शीतल मुळे-भामरे, भाजपचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शासकीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी ते 4 वाजून 23 मिनिटांनी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले.

दाल-खिचडीचा घेतला आस्वाद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुपारी दाल-खिचडीचा आस्वाद घेतला. कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत यांच्यासमवेत रेसिडेन्सी क्लब येथे त्यांनी दुपारचे भोजन घेतले. यानंतर त्यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांशीही संवाद साधला. शासकीय विश्रामगृहावर सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. महापालिकेचे कामकाज अन्य कामकाजांपेक्षा आव्हानात्मक असते, तुमचा अनुभव काय आहे? अशी विचारणाही त्यांनी कादंबरी बलकवडे यांना केली. भविष्यात पन्नास टक्के महिलाच असतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल गेहलोतही उपस्थित होते. दरम्यान, कोश्यारी यांची केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनीही भेट घेतली. दुपारी त्यांनी नागरिकांची निवेदनेही स्वीकारली.

Back to top button