कोल्हापूर : आळते येथील ‘एसबीआय’ची शाखा बंद केल्यास उद्रेक; ग्रामस्थांचा इशारा | पुढारी

कोल्हापूर : आळते येथील 'एसबीआय'ची शाखा बंद केल्यास उद्रेक; ग्रामस्थांचा इशारा

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा: आळते (ता. हातकणंगले) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा बंद करू नका, अन्यथा उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा खणखणीत इशारा ग्रामस्थांच्यावतीने बँकेचे विभागीय महाप्रबंधक व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांना निवेदनातून दिला आहे. माजी जि.प.सदस्य अरुण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांची भेट घेवून निवेदन दिले.

अपेक्षित व्यवसाय होत नसल्याचे कारण पुढे करीत स्टेट बँकेने गुरूवार (दि. 20) पासून आळतेमधील शाखा बंद करून हातकणंगले शाखेत विलिनीकरण करण्याची नोटीस प्रसिध्द केल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात शेतकरी, ग्रामस्थांची बैठक घेवून शाखा बंद करू नये, असा ग्रामपंचायतीचा ठराव केला. या ठरावासह शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन देवून शाखा बंद करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

आळते गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. चार शेती पाणी पुरवठा संस्था आहेत. या माध्यमातून गावात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू झाल्याने बहुतांशी शेतकरी दूध उत्पादकांचे व्यवहार स्टेट बँकेत सुरू झाले. शेतकरी वर्ग बँकेकडे आकर्षित होत असताना अनपेक्षितपणे शाखा बंद करण्याच्या निर्णयाने धक्का बसला आहे.

शेतकर्‍यांची साथ; बँकेकडून मात्र अनास्था

शेतकर्‍यांची साथ असताना बँकेकडून व्यवहार वाढीसाठी प्रयत्न झाले नाहीत. केवळ सोने तारण देण्यापुरतेच काम सुरू आहे. शेती कर्ज, अवजारे, वाहन खरेदी, लघुउद्योग आदींसाठी कर्ज पुरवठा न केल्याने उलाढाल कमी दिसते. हे बँकेचे अपयश शेतकर्‍यांच्या माथी मारून शाखा बंद करण्याचे धोरण चुकीचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

तर रस्त्यावरची लढाई करावी लागेल

जर बँकेने शाखा बंदचा निर्णय मागे घेतला नाही. तर त्याचा गावात उद्रेक होईल. लोक रस्त्यावर उतरतील, असा खणखणीत इशारा ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांना निवेदनातून तीव्र भावना कळवण्यात आलेल्या आहेत. तर गुरूवारी सकाळी गावातील शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेणार आहेत. प्रसंगी रस्त्यावरची लढाई करावी लागेल, असा इशाराही ग्रामस्थ, शेतकर्‍यांनी दिला आहे.

बँकेचे धोरण शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. जाणीवपूर्वक अडवणूक सुरू आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
अरुण इंगवले, माजी जि.प.सदस्य

हेही वाचलंत का ? 

Back to top button