कोल्हापूर : अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या कोल्हापूर ते कळे रुंदीकरण सुरू आहे. कळे ते गगनबावडा या मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 22 गावांतील 18 हेक्टर जमिनीचा 39 कोटी रुपयांचा भूसंपादनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा निधी महसूल विभागाकडे सुपूर्द केला असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोल्हापूर-गनबावडा या मार्गावर अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. वारंवार पॅचवर्क करून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे दुपदरीकरण करून रुंदीकरणाचे नियोजन आहे. हा घाटरस्ता असल्याने अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आणि तीव्र उतार आहेत. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघाताचे प्रकार घडत आहेत. अरुंद आणि खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना तारेवरील कसरत करीत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ही धोकादायक वळणे आणि उतार दूर करण्यासाठी भूसंपादन आवश्यक आहे.
पहिल्या टप्प्यात यापैकी कोल्हापूर-कळे या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने कळे-गगनबावडा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे नियोजन केले आहे. मात्र रुंदीकरणासाठी आवश्यक जमीनीपैकी 90 टक्के भूसंपादन पूर्ण होउन जमीन ताब्यात असल्याशिवाय निधी मंजूर होत नाही. पण 39 कोटी रुपयांचा भूसंपादनाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता कामाला वेग येणार आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी या मार्गावरील 22 गावातील 18 हेक्टर जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यापैकी गगनबावडा तालुक्यातील 17 तर पन्हाळा तालुक्यातील 5 गावांतील भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्ता दुपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील डीपीआर तयार आहे.
भूसंपादनानंतर तातडीने दुपदरीकरणाचा प्रस्ताव : मुधाळे
भूसंपादनाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने प्रक्रीया पूर्ण करुन रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव तातडीने देणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ मुधाळे यांनी सांगितले.
या गावांत होणार भूसंपादन
आसगाव, खेरिवडे, परखंदळे, खडुळे, मुटकेश्वर, लोंधे, किरवे, साक्री, तिसंगी, साळवण, मांडुकली, शेणवडे, मार्गेवाडी, खोकुर्ले, आसळज, पळसंबे, सैतवडे, सांगशी.