कोल्हापूर : दत्तवाड येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली | पुढारी

कोल्हापूर : दत्तवाड येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणार्‍या वाहनाला रोखले व वाहनाच्या चाकातील हवा सोडली. स्वाभिमानी संघटनेच्या मागण्या मान्य होईपर्यंत ऊस वाहतूक न करण्याचा इशारा दिला.

गत हंगामातील 200 रुपये तसेच जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत स्वाभिमानीने ठरवलेला एफआरपी अधिक 350 रू. दर साखर कारखानदारांनी मान्य केल्याशिवाय ऊसतोड करू देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याबाबत येथील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ऊसतोड न करण्याची सूचना केली होती. मात्र तरीही ऊसतोड करून वाहन कारखान्याकडे पाठवले जात होते. त्यामुळे नाराज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी येथील बांबरवाडी वसाहत येथे ट्रॅक्टर वाहनाला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखले व चाकातील हवा सोडून दिली.

यावेळी बंडू चौगुले, सुकुमार सिद्धनाळे, प्रकाश मगदूम, श्रेणिक धुपदाळे, राजेंद्र व्हसकल्ले, प्रवीण सुतार, सचिन हेमगिरे, सुरज हेमगिरे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button