कोल्हापूर : पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान | पुढारी

कोल्हापूर : पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल 26 जानेवारी 2021 मध्ये जाहीर झालेले राष्ट्रपती पदक जिल्हा विशेष शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी मुंबईत राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र पोलिस दलातील 28 वर्षांच्या सेवेत तानाजी सावंत यांनी मुंबई, नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात कामगिरी बजावली आहे. सावंत सध्या कोल्हापूर पोलिस दलात जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत. पोलिस दलातील कामगिरीची दखल घेत वरिष्ठाधिकार्‍यांकडून त्यांनी चारशेवर बक्षिसे प्राप्त केली आहेत. 2010 मध्ये उत्कृष्ठ पोलिस अधिकारी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला होता.

28 जानेवारी 2020 मध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोल नाक्यावर कुख्यात 007 बिष्णोई टोळीशी झालेल्या जीवघेणी, थरारक चकमकीत म्होरक्या शामलाल पुनियासह साथीदारांना सावंत यांच्यासह पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. यावेळी झालेल्या गोळीबारात पुनियांसह साथीदारही गंभीर जखमी झाले होते. 2017 पासून गँगस्टर व त्यांचे साथीदार राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारमधून फरार होते. पोलिस दलातील कामगिरीची दखल घेत सावंत यांना 2021 मध्ये राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते.

कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री, वरिष्ठाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी सावंत यांच्या पत्नी ललिता सावंत, कन्या आराधना, हरिप्रिया, निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. डी. सावंत, पूजा सावंत यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

Back to top button