कोल्हापूर : अंबाबाई दर्शनाला पाच लाखांवर भाविक | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई दर्शनाला पाच लाखांवर भाविक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई दर्शनासाठी दररोज भाविकांच्या गर्दीचा नवा उच्चांक होत आहे. शनिवारी दिवसभरात पाच लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता दोन्ही दर्शन मंडप भरून जुना राजवाड्याला दोन वळसे घालून रांग मोतीबाग तालमीजवळ गेली होती.

भाविकांचा अखंड ओघ सुरूच असून, शनिवारी सुट्टीदिवशी प्रचंड गर्दी झाली. रविवारी (दि. 2) गर्दीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.

शनिवारी एका दिवसात सायंकाळी 6 वाजेपर्यंत रेकॉर्डब—ेक म्हणजे 4 लाख 87 हजार 521 भाविकांनी दर्शन घेतले, तर रात्री आठ वाजल्यानंतरही दर्शनरांग दोन्ही मंडप भरून भवानी मंडपात होती. काही काळ पाऊस आला तरी भाविकांची गर्दी कायम होती. घटस्थापनेपासून सहाव्या माळेपर्यंत 13 लाख 62 हजार 428 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे.

दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रौत्सव निर्बंधमुक्त साजरा होत आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दोन वर्षांनंतर भाविक अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येत आहेत.

घटस्थापनेदिवशी (25 सप्टेंबर) घरोघरी पारंपरिक घरगुती कार्यक्रम असल्याने तुलनेने गर्दी कमी होती. दुसर्‍या दिवशीपासून भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दि. 26 रोजी 68 हजार 527 भाविकांची नोंद झाली होती. पुढील तीन दिवसांत एक लाखावर म्हणजेच दीड ते पावणेदोन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद आहे. ललितपंचमीला शुक्रवारी सुमारे तीन लाख 22 हजार 425 भाविकांनी दर्शन घेतले, तर शनिवारी आठवडाभरातील सर्वोच्च पाच लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही विभागाकडे झाली आहे.

Back to top button