कोल्हापूर : शिरढोण येथे आर्थिक देवाण-घेवाणीतून हाणामारी; एक जखमी | पुढारी

कोल्हापूर : शिरढोण येथे आर्थिक देवाण-घेवाणीतून हाणामारी; एक जखमी

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : शिरढोण (ता. शिरोळ) येथे उसने दिलेल्या पैशाची देवाण-घेवाण आणि महिलांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणात झालेल्या हाणामारीत दोघेजण जखमी झाले आहेत. सार्थक कुबेर हेरवाडे (वय 19, रा.शिरढोण ता.शिरोळ) याच्या डोक्यात वीट मारल्याने जखमी झाला आहे. तर सूर्यकांत सुभाष आलासे (वय 34) हा किरकोळ जखमी झाला आहे. दोघांना दत्तवाड (ता.शिरोळ) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या हाणामारी प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान दोन्हीकडील लोक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ही घटना कोरोना काळातील आर्थिक देवाण-घेवाणीतून झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला दाम दुप्पटीचा फंडा की व्याजाने घेतलेले पैसे यावरून गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे. अशा घटनांना रोखणे हे पोलीस प्रशासनासमोर आवाहन आहे.

गेल्या दोन दिवसापासून यांच्यातील वाद धुमसत होता. त्याचे पर्यावसान आज शिवीगाळ व हाणामारीत झाले. तथापि सोमवारी संध्याकाळी पंचामार्फत त्यांच्यात समजोता बैठक होणार होती. मात्र त्याआधीच या दोघामधील वाद विकोपाला जाऊन सार्थक हेरवाडे आणि सूर्यकांत आलासे यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये सार्थक हेरवाडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी हेरवाडे व आलासे या दोघांना ही उपचारासाठी दत्तवाड रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button