कोल्हापूर : ‘अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रिया बेकायदेशीर’ | पुढारी

कोल्हापूर : 'अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रिया बेकायदेशीर'

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी अंबाबाई देवी मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून जनतेला अंधारात ठेवून केली आहे. याला राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. या कामात सहभागी असणार्‍या देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सचिव, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांनी राजीनामा द्यावा. तसेच या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याप्रकरणी शनिवारी दुपारी 12 वाजता देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
पुरातत्त्व खात्याने संवर्धनाच्या नावाखाली मूर्तीची तात्पुरत्या रासायनिक प्रक्रियेद्वारे डागडुजी केली. ही बाब लाखो भाविकांच्या श्रद्धेला बाधा आणणारी आहे. एका पूजा करणार्‍या व्यक्तीच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला असून वास्तव लोकांसमोर उघड होणे गरजेचे आहे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

अंबाबाई मूतीर्र्ची सध्याचीस्थिती कशी आहे, आठ दिवसांपूर्वी अचानक असे काय घडले की, जिल्हा प्रशासनातील प्रमुख लोकांनी अंबाबाई मंदिरात ठाण मांडून संवर्धनाचे काम तातडीने केले? असे प्रश्न उपस्थित केले. काही मान्यवर, तज्ज्ञ, पुजारी यांची समिती गठन करून मूर्ती बदलायची की नाही, याचा विचार व्हावा. देवस्थान समिती व पुजारी यांच्या वादात मूर्तीचे कोणतेही नुकसान होऊ नये, याची दक्षता घ्यावी. अन्यथा या विरोधात तीव— लढा उभारण्याचा इशाराही दिला. शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे आदींचा समावेश होता.

Back to top button