माजी महापौर बाबू फरास यांचे निधन | पुढारी

माजी महापौर बाबू फरास यांचे निधन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; माजी महापौर बाबू हारुण फरास (वय 75) यांचे निधन झाले. तीन दिवसांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सोमवारी (दि. 19) सकाळी अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

महापालिकेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावत महापौर बनलेले फरास यांची सभागृहात बिनआवाजाचा बॉम्ब फोडणारा महापौर म्हणून ओळख होती. फरास यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

1978 ला महापालिकेच्या पहिल्या सभागृहात ते निवडून आले. तीनवेळा नगरसेवक, शिक्षण समिती सदस्य, तीनवेळेला पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता, अशी त्यांची कारकीर्द राहिली.1999 मध्ये ताराराणी आघाडीला सुरुंग लावून त्यांनी महापौरपद खेचून आणले. हे पद मिळविण्यासाठी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधून शिवसेना नगरसेवकांचा पाठिंबा मिळविला होता. फरास यांची धडपड पाहून बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘जा तुला महापौर केले,’ असा शब्द दिला होता. अल्पसंख्याक समाजातील असूनही शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यात फरास यशस्वी झाले. फरास गेल्या काही वर्षांपासून आजारी होते.

Back to top button