कोल्हापूर : साऊंड सिस्टिम, लेसर शोचे आकर्षण | पुढारी

कोल्हापूर : साऊंड सिस्टिम, लेसर शोचे आकर्षण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षे निर्बंध लादले होते. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला गेला. दोन वर्षांची ही कसर यंदा मंडळांनी भरून काढली आहे. पहिल्या दिवसापासूनच तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असल्याने यंदा गणेशोत्सवाची भव्यता वाढली. लेसर लाईटने यंदा सर्वच मंडळांना वेड लावले आहे. प्रत्येक मंडळाने मिरवणुकीत लेसर लाईटला प्राधान्य दिले आहे. ढोल-ताशा पथकांची क्रेझही वाढली आहे. आगमन मिरवणुकीत याचे महत्त्व अधोरेखित झालेच होते. विसर्जन मिरवणुकांची भव्यता या पथकामुळे वाढणार आहे.

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळातर्फे ढोल पथक

शाडूची पर्यावरणपूरक मूर्ती मंडळाने बसविली आहे. सकाळी सहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. शाहू गर्जना ढोल पथकाचा समावेश असणार आहे.

शाहूपुरी युवक मंडळाच्या शाहू चित्ररथाचे आकर्षण

शाहूपुरी युवक मंडळाने शाहू स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शाहू जीवनावर आधारित चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथासह मंडळ मिरवणुकीत उतरणार आहे.

साऊंड सिस्टिमचा दणदणाट शहरातील बहुतांश मंडळांनी यंदाच्या वर्षी आधुनिक विद्युत रोषणाईला प्राधान्य दिले आहे. यामुळे शहरच उजाळून निघणार आहे. साऊंड सिस्टिमचा दणदणाट आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटात तरुणाई थिरकणार आहे.

अवचितपीर तालमीचा रशियन डीजे

अवचितपीर तालमीने रशियन डीजेसह मिरवणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंडळाचे कार्यकर्ते त्याची जय्यत तयारी करत आहेत.

‘लेटेस्ट’चा शाहूरथ

छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधत मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने शाहू जीवन कार्यावर आधारित भव्य रथ तयार केला आहे. हा रथ घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत उतरणार आहेत.

Back to top button