कोल्हापूर : कळंबा कारागृहाचे सुभेदार संजित कदम यांना ‘राष्ट्रपती पदक’ | पुढारी

कोल्हापूर : कळंबा कारागृहाचे सुभेदार संजित कदम यांना ‘राष्ट्रपती पदक’

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : उल्लेखनीय कामासाठी देशातील कारागृह अधिकारी व कर्मचार्‍यांना राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक घोषित करण्यात आले. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील सुभेदार संजित रघुनाथ कदम यांना दुसर्‍यांदा ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर झाले आहे. यापूर्वी 2015 मध्येही त्यांचा ‘राष्ट्रपती पदका’ने सन्मान करण्यात आला होता. तसेच गडहिंग्लज तालुक्यातील कडगावचे आप्पासाहेब बाबुराव शेवाळे यांनाही ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर झाले.

संजित कदम मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील तेरव (ता. चिपळूण) गावचे राहणारे आहेत. 1992 साली ते येरवडा जेलमधून सेवेत रुजू झाले. यानंतर काही काळ पुण्यातील ट्रेनिंग स्कूलचे निदेशक होते. 2015 मध्ये त्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक, मे 2022 मध्ये महासंचालक पदक प्राप्त झाले आहे. कदम हे उत्कृष्ट कबड्डीपटू व व्हॉलीबॉल खेळाडू असून, कारागृहाच्या वतीने त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग नोंदवला आहे.

कडगावच्या सुपुत्राचा सन्मान

कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब शेवाळे यांनाही राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. सध्या ते खंडाळा पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे उपप्राचार्य असून प्रतिनियुक्तीवर पोलिस संशोधन केंद्र, पुणे येथे सेवा बजावत आहेत. 1989 साली ते उपनिरीक्षक म्हणून पोलिस खात्यात रुजू झाले होते. त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशन, सिंधुदुर्गातील बांदा, कणकवली पोलिस स्टेशन, सोलापूर ग्रामीणमध्ये अक्कलकोट, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. 2007 साली महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

Back to top button