कोल्हापूर : मृतदेह आठ दिवस सीपीआरच्या शवागारातच पडून | पुढारी

कोल्हापूर : मृतदेह आठ दिवस सीपीआरच्या शवागारातच पडून

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी येथे हृदयविकाराने 17 जुलैला मृत झालेल्या अनोळखी महिलेचे शवविच्छेदन करून तिचा मृतदेह 18 रोजी सीपीआरमध्ये आणण्यात आला होता. नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत हा मृतदेह ठेवून त्यावर अंत्यसंस्कार होणे गरजेचे होते. परंतु यामध्ये आठ दिवसांचा विलंब झाल्याने हा मृतदेह शवागारातच पडून राहिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शवागारातील फ्रिजर (कोल्ड स्टोअरेज) चांगल्या स्थितीत असून येथील सहा पैकी केवळ 2 कॅबिनेटचे कूलिंग कमी असल्याचे सीपीआर प्रशासनाने स्पष्ट केले.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात मृतदेह सडल्याने दुर्गंधी येत असल्याचा प्रकार समोर आला होता. कोल्ड बॉडी कॅबिनेट जवळपास 8 ते 10 वर्षे जुने आहे. यात सहा मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. याठिकाणी ठेवलेला मृतदेह सडल्याने त्याची दुर्गंधी पसरली होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. सडलेला मृतदेह हा आठ दिवसांहून अधिक वेळ ठेवल्यानेच हा प्रकार झाल्याचे पुढे आले आहे. 17 जुलैला शाहूवाडीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्याची उत्तरीय तपासणी करून 18 रोजी तो सीपीआर कोल्ड स्टोअरेजमध्ये आणण्यात आला.

पोलिसही त्या महिलेची ओळख पटवून नातेवाईकांचा शोध घेत होते. या कालावधीत 3 ते 5 दिवसांत नातेवाईकांचा शोध न लागल्याने पोलिसांकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार होणे गरजेचे होते. मात्र हा मृतदेह 25 जुलैला अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला. आठ दिवस हा मृतदेह पडून राहिल्याने तो सडून दुर्गंधी पसरल्याचे स्पष्ट झाले.

कोल्ड स्टोअरेज सुस्थितीत : डॉ. कांबळे

नातेवाईकांचा शोध होईपर्यंत 3 ते 5 दिवस मृतदेह ठेवला जातो. तो 21 तारखेला जाणे गरजेचे होते. पण यात थोडा उशीर झाला. पण हा मृतदेह उघड्यावर मिळाला होता. इतके दिवस लागल्यामुळे हे घडले आहे. सीपीआरमधील कोल्ड बॉडी कॅबिनेट 6 पैकी 2 मध्ये कूलिंग कमी होते. पण मृतदेहही चांगल्या कॅबिनेटमध्ये होता. इतर दोन कॅबिनेटची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी सांगितले.

Back to top button