कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या नियोजनबद्ध पाणी विसर्गामुळे पूर धोका टळला | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या नियोजनबद्ध पाणी विसर्गामुळे पूर धोका टळला

राशिवडे; प्रवीण ढोणे : राधानगरी धरणक्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. तरीही पाटबंधारे विभागाच्या समयसूचक आणि बिनचुक नियोजनामुळे पुराचा धोका टाळण्यास यश मिळाले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा शिल्लक असूनही जलसंपदा विभागाने पाणीविसर्गाचे चांगले नियोजन केले. त्यामुळे अतिवृष्टीमुळे उद्भवणारी पूरस्थिती रोखण्यास यश आलं आहे. गतवर्षी राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात १ जून ते १८ जुलै या  कालावधीत  १४२८ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर १ जुनपूर्वी धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. १८ जुलै रोजी धरणाचा ४.५ टीएमसी पाणीसाठा होऊन धरण ४८ टक्के भरले होते. यावर्षी १ जून ते १८ जुलै याच कालावधीत तब्बल १९६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने भिजक्षेत्रात सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी होती. त्यामुळे  १ जूनपूर्वी ३४ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. जलसंपदा विभागाने हवामान विभागान दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार धरणातील पाणी विसर्गाचे नियोजन केले. तसेच अतिवृष्टी काळात धरण भरू न दिल्याने पुराचा धोका टळला आहे. पाटबंधारे विभागाने वेळोवेळी पाण्याच्या विसर्गाचे केलेले हे नियोजन आणि समयसूचकतेमुळे सध्यातरी जिल्ह्यावरी पुराचे संकट टळले आहे.

हेही वाचा :

Back to top button