मंचर : आढळराव पाटील शिंदे गटात; शिवसेनेत खळबळ | पुढारी

मंचर : आढळराव पाटील शिंदे गटात; शिवसेनेत खळबळ

मंचर, पुढारी वृत्तसेवा: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मुख्यमंत्री एमनाथ
शिंदे यांच्या गटात सोमवारी दुपारी गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आढळरावांच्या निर्णयाचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून, यामध्ये आढळराव पाटील यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊ नये, अशी भूमिका पहिल्यांदा खासदार शिवाजीराव पाटील यांनी मांडली होती.

त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घ्या, असे सांगण्यात आले होते. मात्र, गेली अडीच वर्षे मतदारसंघात कामे करीत असताना आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेल्या संघर्षाबाबत वारंवार बोलून दाखवत होते. मात्र, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याची बातमी 3 जुलै रोजी विविध चॅनेल, न्यूज पोर्टलवर प्रसारित झाली होती. मात्र, काही वेळातच आढळराव पाटील हे शिवसेनेत असून, त्यांची हकालपट्टी करण्यात आली नसल्याचे जाहीर करण्यात आले.

मात्र, यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पक्षावर व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यावर झालेल्या प्रकरणावर पडदा पडला होता. झालेल्या प्रकाराबाबत आढळराव पाटील प्रचंड नाराज होते. ते भाजप किंवा शिंदे गटात जाणार, अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आढळराव पाटील यांनी ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना शिरूर मतदारसंघ सोडून पुण्यातून लढण्यास सांगितल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मात्र, शिवसेना कार्यकर्ते व खासदार आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी करीत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांना मतदारसंघात त्रास दिला जात आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिक व नेत्यांना न्याय मिळत नाही, याची खदखद मनात असल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षाबाबत नाराज असल्याने आढळराव पाटील अखेर शिंदे गटात गेले. आढळराव पाटील यांनी मंगळवारी (दि. 19) त्यांच्या निवासस्थानी लांडेवाडी येथे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची तातडीची बैठक बोलावली आहे. तेथे काय बोलणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button