गझल गायक भूपिंदर यांचे मुंबईत निधन | पुढारी

गझल गायक भूपिंदर यांचे मुंबईत निधन

मुंबई : आपल्या मखमली आवाजाने जनमानसावर गारूड केलेले प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंग यांचे सोमवारी मुंबईत दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांची पत्नी गायिका मिताली सिंग यांनी ही माहिती दिली. भूपिंदर सिंग यांचा जन्म पंजाब प्रांतातील पतियाळा संस्थानात ८ एप्रिल, १९३९ रोजी झाला होता. त्यांचे वडील प्रा. नत्था सिंग हेही नामवंत संगीतकार होते. त्यांच्याकडूनच भूपिंदर यांनी संगीताचे धडे गिरवले. मात्र, वडील अत्यंत कडक शिस्तीचे असल्यामुळे एकेकाळी भूपिंदर यांना संगीत म्हटले की, विलक्षण राग येत असे. नंतर त्यांनी सुरांवर हुकमत मिळवली आणि गझल गायनाद्वारे त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. भूपिंदर यांची गाजलेली गाणी : किसी नजर को तेरा इंतजार है… दिल ढूँढता हैं… नाम गुम जायेगा… एक अकेला इस शहर में. हुजूर इस कदर भी ना…!

Back to top button