कोल्हापूर : खा. मंडलिक, माने शिंदे गटाच्या वाटेवर | पुढारी

कोल्हापूर : खा. मंडलिक, माने शिंदे गटाच्या वाटेवर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा मार्ग शिवसेना खा. संजय मंडलिक यांनी रविवारी आणखी प्रशस्त केला. मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी हमीदवाडा येथे मेळावा घेऊन मंडलिक यांनी शिंदे यांच्यासोबत जावे, अशी आग्रही भूमिका घेतली.

दरम्यान, आपण शिवसेनेतच आहोत, असे खा. मंडलिक यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. दुसरे खा. धैर्यशील माने यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नसून, दोघेही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी रविवारी दिल्‍लीत पोहोचले आहेत.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. याकरिता खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने दिल्‍लीला गेले आहेत. शिवसेनेने ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. आता या मतदानानंतरच मंडलिक व माने शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त काढणार असल्याचे समजते.

संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मेळावा घेऊन शिंदे गटाबरोबर जावे, अशी आग्रही भूमिका घेतली आहे; तर धैर्यशील माने यांच्यावरही कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. सध्या हे दोघेही दिल्‍लीत आहेत. दिल्‍लीहून परतल्यानंतर किंवा दिल्‍लीतूनच नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन ते आपला निर्णय जाहीर करतील, असे समजते.

दरम्यान, संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे, असे आवाहन करणारी भूमिका दिल्‍लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. त्याचवेळी आपण आपला निर्णय एक-दोन दिवसांत जाहीर करू. उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे ठाकरे व शिंदे यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Back to top button