कोल्‍हापूर : प्रयाग चिखली,आंबेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू | पुढारी

कोल्‍हापूर : प्रयाग चिखली,आंबेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू

वडणगे (कोल्‍हापूर ) : पुढारी वृत्तसेवा : पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने गुरुवारी आंबेवाडी व चिखली ग्रामस्थांनी संभाव्य महापुराचा धोका ओळखून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. प्रयाग चिखली येथील ग्रामस्थांनी आपल्या जनावरांसह सोनतळी येथील पुनर्वसन वसाहत तसेच पाहुण्यांच्याकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवारी चिखली येथील सुमारे दोन ते अडीच हजार लोकांनी तर आंबेवाडी येथील सुमारे आठशे लोकांनी स्थलांतर केले. 2019 सालच्या महापुरात प्रयाग चिखली येथील पशुधन मोठ्या प्रमाणात दगावले होते. हा धोका ओळखून प्रयाग चिखली येथील बहुतांश शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे सोनतळी येथे हलवली आहेत.

दरम्यान, चिखलीला जोडणारे तीनही रस्ते अद्याप पाण्याखाली गेलेले नाहीत. मात्र पाणी पातळीत होणारी वाढ व संभाव्य पुराचा धोका ओळखून गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान येथील प्रयाग संगमावरील दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. चिखली ग्रामस्थांची सोनतळी येथील प्राथमिक शाळा, समाज मंदिर, व आश्रम शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबेवाडी गावच्या स्थलांतरित लोकांना जुना बुधवार पेठेतील कल्याणी हाॅल. जैन मठ, विवेकानंद हायस्कूल या ठिकाणी राहण्याची सोय शासन पातळीवर करण्यात आल्याचे सरपंच सिकंदर मुजावर यांनी सांगितले.

तहसीलदार शितल मुळे-भांबरे,  गटविकास अधिकारी श्री उगले ,तालुका आरोग्य अधिकारी जी.डी.नलवडे, पाणीपुरवठा विभागाचे एस. के. बारटक्के, बांधकाम विभागाचे अमित पाटील ,गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील ,कृषी अधिकारी सुनील रुपनर ,तलाठी श्रीकांत नाईक ,ग्रामसेवक गिरीगोसावी यांच्या टीमने चिखली व आंबेवाडीमध्ये फिरून लोकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
दरम्यान अजूनही पुराची कोणतीही गंभीर स्थिती निर्माण झालेली नाही. स्थलांतरासाठी लोक सहकार्य करत असल्याचे चिखलीच्या सरपंच उमा पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button