पुणे: चोरीच्या चेकद्वारे मोलकरणीने वटवले तब्बल साडे नऊ लाख | पुढारी

पुणे: चोरीच्या चेकद्वारे मोलकरणीने वटवले तब्बल साडे नऊ लाख

पुणे, पुढारी वृत्तसेवा: तब्बल अठरा वर्षे काम करत असताना मोलकरणीने सही केलेल्या धनादेशांंची चोरी करून तब्बल 9 लाख 40 हजार रूपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मोलकरणीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिनाक्षी लक्ष्मण दाखले (45, रा. महमंदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव असून तिला 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याबाबत रणजित सिंग (44, रा. उंड्री) यांनी फिर्याद दिली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले, फिर्यादी हे व्यावसायीक आहेत. ते त्यांचे निवृत्त ब्रिगेडीअर वडील आणि आई बरोबर उंड्री येथील एल्डोरा न्याती अ‍ॅम्बीयान्स सोसायटीत राहण्यास आहेत. तर मिनाक्षी दाखले हे गेली अठरा वर्षापासून त्यांच्याकडे घरकामास होती. फिर्यादींच्या वडीलांचे मागील महिन्यात निधन झाले. घरात दुखाचे वातावरण असल्यामुळे फिर्यादींच्या आईजवळील फोन बंद होता. महिनाभरानंतर त्यांच्या आईचा फोन सुरू करण्यात आला. तेव्हा त्यांच्या फोनवर साडेतीन लाख रूपये कट झाल्याचा मेसेज त्यांना आला. फिर्यादीने साडेतीन लाख काढल्याबाबत आईकडे विचारणा केली. आईने मी कोणतेही पैसे काढले नसल्याचे सांगितले. फिर्यादी यांना हा काहीतरी सायबर फ्रॉडचा प्रकार वाटल्याने त्यांनी आई आणि वडीलांचे जॉईंट खाते असलेल्या बँकेत धाव घेतली. त्यांनी बँकेत विचारणा केली असता त्यांना हा कोणताही सायबर फ्रॉड नसून धनादेशाद्वारे पैसे वटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता साडेतीन लाख रूपये हे मिनाक्षी दाखले हिने घरातील आई-वडीलांनी सह्या करून ठेवलेले धनादेश चोरून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत फिर्यादी यांनी आणखी माहिती घेतली असता दुसर्‍या बँकेच्या खात्यातूनही दाखले हिने अशाच पध्दतीने पैसे काढल्याचे समोर आले. तिने दोन्ही खात्यातून तब्बल 9 लाख 40 हजार रूपये काढल्यचा प्रकार लक्षात आला. याबाबत तिला पैशाची विचारणा करूनही तिने काही न सांगितल्यने तिला अटक करण्यात आले. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास सहायक निरीक्षक मोहिते करीत आहेत.

त्यांच्याकडे काम करणार्‍या दाखले हिने पैसे धनादेशाद्वारे काढण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेत याबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी 50 हजारांवरील रक्कम काढताना पॅनकार्डची झेरॉक्स दिली होती. ती झेरॉक्स प्रत तिची आणि तिच्या सुनेची असल्याचे तपासात समोर आले आहे.
– रणजित मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस ठाणे.

Back to top button