मिशन अ‍ॅडमिशन! | पुढारी

मिशन अ‍ॅडमिशन!

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच शाळा, महाविद्यालये पूर्णक्षमतेने सुरू झाली आहेत. बालवाडी ते पदवी प्रथम वर्षासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक तसेच पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आयटीआय आनॅलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

आयटीआय ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रियेस 17 जूनपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील शासकीय, खासगी आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. शासकीय आयटीआयमध्ये 31 ट्रेडसाठी 1364 जागा उपलब्ध आहेत. यात एक वर्ष मुदतीचे 15, तर दोन वर्षे मुदतीचे 16 ट्रेड आहेत. यात टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टूल अँड डायमेकर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअरकंडिशनर, मेकॅनिक मोटार व्हेईकल, स्टेनोग्राफी, फौंड्रीमन आदी ट्रेडचा समावेश आहे. महिला व मुलींसाठी 30 टक्के आरक्षण आहे. दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. प्रवेश प्रक्रियेची माहिती http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शासकीय आयटीआयचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी सांगितले.

पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेंतर्गत विद्यार्थी नाव नोंदणीस सुरुवात झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशाचे वेळापत्रक https://poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यात शासकीय 1, अनुदानित 1 यासह खासगी 18 अशी एकूण 20 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. यात प्रवेशाच्या 6 हजार 600 जागा उपलब्ध आहेत. 30 जूनपर्यंत नाव नोंदणीबरोबरच प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करावी लागणार आहे, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. महादेव कागवाडे यांनी दिली.

पदवी प्रथम वर्ष…

बारावी परीक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर महाविद्यालयांनी पारंपरिक अभ्यासक्रम बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.बरोबरच बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांसाठी रजिस्ट्रेशनबरोबरच प्रवेश अर्जांची विक्री सुरू केली आहे. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 चे शैक्षणिक सत्र 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्यात संपेल. त्यानंतर महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही. एम. पाटील यांनी दिली.

अकरावी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन सुरू

कोल्हापूर शहरस्तरीय 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत विज्ञान आणि वाणिज्य शाखा प्रवेश भाग-1 साठी शुक्रवार (दि.17) पासून विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शहरातील 31 कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 10 हजार 960 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने शहरस्तरीय अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. www.dydekop.org या संकेतस्थळावर नावनोंदणी प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने भाग 1 व 2 भरून दोन फेर्‍यांत पूर्ण करण्यात येणार आहेत. दहावीचा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाला असला तरी अन्य बोर्डांच्या निकालाबाबत स्पष्टता नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-1 भरता येईल. मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर मुख्य प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी दिली.

पॉलिटेक्निक प्रवेश वेळापत्रक…
ऑनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी : 30 जूनपर्यंत

तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 3 जुलै
गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविण्याची मुदत : 4 ते 6 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 7 जुलै

आयटीआय प्रवेश प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करणे, अर्जात दुरूस्ती : 17 जूनपासून सुरू

अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश अर्ज निश्चित करणे : 22 जून
पहिल्या फेरीसाठी विकल्प, प्राधान्यक्रम सादर करणे : 22 जून

Back to top button