कोल्हापूरच्या पैलवानाने जिंकले मखमलाबादचे मैदान; २ लाखांची इनामी कुस्ती विजयी | पुढारी

कोल्हापूरच्या पैलवानाने जिंकले मखमलाबादचे मैदान; २ लाखांची इनामी कुस्ती विजयी

पंचवटी,(कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील मखमलाबादच्या प्रसिद्ध २ लाखाच्या इनामी कुस्तीचा मान कोल्हापूरच्या प्रकाश (विशाल) बनकर याने पटकावला. त्याने अक्षय शिंदे याला चितपट करत मखमलाबादच्या मातीतील मैदान मारले. मखमलाबादचे तालिम फौंडेशन आणि नाशिकच्या जय बजरंग तालीम संघाकडून या नामी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेते असल्याने या कुस्तीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.

आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रेरणेने आणि नाशिक शहर तालिम संघाचे उपाध्यक्ष पैलवान वाळू काकड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २२ वर्षांपासून मखमलाबादमध्ये या भव्य निकाली कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, शासनाने नियमही शिथिल केले आहेत. तसेच अनेक कुस्तीप्रेमींच्या आग्रहानंतर मखमलाबाद येथील मराठा मंगल कार्यालयासमोरील मैदानात गुरुवारी सायंकाळी या निकाली कुस्त्यांची भव्य दंगल पार पडली. या कुस्तीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधूनही पैलवानांनी हजेरी लावली होती. तसेच नाशिक जिल्ह्यातील कुस्तीप्रेमीं ही मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

कुस्ती विजेत्यांसाठी अगदी पाच हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे इनाम ठेवण्यात आले होते. दोन लाख इनाम असलेली ही कुस्ती प्रकाश बनकर आणि अक्षय शिंदे या दोन महाराष्ट्र केसरी उपविजेत्यांमध्ये रंगली. अटीतटीच्या लढतीत प्रकाश बनकरने अक्षय शिंदेला चितपट करीत बाजी मारली. आणि दोन लाखांचे बक्षीस असलेली इनामी कुस्ती प्रकाश याने जिंकली. अन्य कुस्त्यांमध्ये बाळू बोडके, संदीप निकम, उदय काकड, मंथन काकड, माऊली गायकवाड, सागर चौगुले, ओमकार फरतडे आदी पैलवानांनी बाजी मारली.

हेही वाचा  

Back to top button