नेवासा तालुक्यात गडाखांचा वरचष्मा; लंघेंची अडचण! | पुढारी

नेवासा तालुक्यात गडाखांचा वरचष्मा; लंघेंची अडचण!

नेवासा : नेवासा तालुक्यात सात गट होते, आता आठ गट व 16 गण झाले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणांचा आराखडा तयार झालेला आहे. नव्याने तयार झालेला आराखडा हा गडाख गटाच्या पथ्यावर पडणारा दिसत आहे. विरोधकांच्या तंबूतील अनेक मातब्बर, पदाधिकारी शिवसेनेत आल्याने तालुक्यावर गडाख गटाचेच वर्चस्व बळकट झाले आहे. विरोधकांची वाताहत झाली असून, आता आगामी काळात या निवडणुकीत राजकीय ताकदीने कमी झालेला विरोधक गडाख गटाचा कसा सामना करतात, याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.

सध्या तरी नेवासा तालुक्यातील राजकीय समीकरणे गडाख गटाच्या बाजूनेच दिसत आहेत. व्यक्ती केंद्रित निवडणुका सतत होत आलेल्या आहेत. आता मंत्री गडाख शिवसेनेत असल्याने येणार्‍या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा बोलबाला राहणार आहे. गटांच्या आरक्षणावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.

नागवडे, पाचपुते सेफ, नेत्यांना सोयीचे गट; तर कार्यकर्त्यांना पंचायत समितीची संधी

नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढलेल्या असल्या, तरी या जागांवर आरक्षण कसे पडणार? याचीच जोरदारपणे चर्चा सुरू झाली आहे. चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणत्या गटात कसे आरक्षण पडते? याविषयी गडाख, मुरकुटे व लंघे समर्थकांमध्ये चर्चा होत आहेत. गटांचे आरक्षण होईपर्यंत कोणीही उघडपणे बोलताना दिसत नाही. निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुकांच्या मात्र लोकांच्या गाठीभेटी होत आहेत. सोनई, बेलपिंपळगाव, चांदा, भानस हिवरा गटांवर मंत्री शंकरराव गडाख गटाचा प्रभाव राहिला आहे. आता नव्याने होणार्‍या शिंगणापूर गटही सोनईचा परिसर असल्याने गडाख गटांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. कुकाणा गटात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे गटाने वेळोवेळी आपला प्रभाव अबाधित ठेवला. कुकाणा गटातून कन्या तेजश्री लंघे या गटातून जिल्हा परिषद सदस्या आहेत. पंरतु, आता कुकाणा ऐवजी सलाबतपूर गट झाला आहे. यामधील शिरसगाव गणाऐवजी खामगाव गण तयार झाला.

कुकाणा गटाची मोडतोड झाली आहे. कुकाणा गण भेंडा गटात गेला, तर कुकाणा गटाचे अस्तित्व नाहीसे झालेे. लंघे गटाचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे लंघेंना आपला प्रभाव दाखवावा लागणार आहे; परंतु ते कोणत्या भागात नशीब अजमावतात याकडेही लक्ष लागले आहे. भेंडा गटात मुरकुटे – घुले गटांचे प्रभाव आहे, तर बेलपिंपळगाव गटात काही वर्षांपूर्वी विठ्ठलराव लंघे गटाने वर्चस्व स्थापित केले; परंतु गेल्या काही वर्षांपासून प्रशांत गडाखांनी बेलपिंपळगाव परिसरात विशेष लक्ष घातल्याने या गटावरही गडाख गटाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. भेंडा गटामध्ये नव्याने कुकाणा गण करण्यात आला. भेंडा व कुकाणा परिसरातील अनेक विरोधक शिवसेनेच्या तंबूत आले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगावमधील त्यांचा पुतण्या अजित मुरकुटेंसह मोठ्या संख्येने लोकांनी मंत्री शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली सेनेत प्रवेश केल्याने मुरकुटे गटाला चांगलाच हादरा बसला आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले सेफ, मात्र हर्षदाताईंची पंचायत

मातब्बर विरोधकांचा ताबूत गडाख गटाने शांत केल्याने आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विरोधक किती सक्षम राहतो याकडे जाणकारांचे लक्ष लागून आहे. भेंडा गटात पूर्वी मुरकुटे, घुलेंचे वर्चस्व दिसून येत होते. आता घुले व गडाखांची सोयरिक पक्की झाल्याने गडाखांची ताकद निश्चितच वाढली आहे. गडाख गटानेही विशेष लक्ष देऊन हा परिसर कब्जात केलेला दिसत आहे. घुले – गडाख सोयरिकीने भेंड्यासह तालुक्यात गडाखमय वातावरण सध्या दिसत आहे.

आता तालुक्यात विरोधक किती?

आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गडाख विरोधक भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह विठ्ठलराव लंघे, तुकाराम गडाख व अन्य किती प्रमाणात एकी दाखवतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. तालुक्यात विरोधक किती राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांची मोट कशी राहणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

एक नजर बदलावर

तालुक्यात पाचेगाव गण नव्याने वाढला. कुकाणा गटाचे अस्तित्व संपवून सलाबतपूर आणि खरवंडीचे अस्तित्व संपवून शिंगणापूर नवीन गट निर्माण झाला.

Back to top button