कोल्हापूर : जिल्ह्यातील शाळा शुक्रवारी बंद | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील शाळा शुक्रवारी बंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, यांसह इतर मागण्यांसाठी 11 मार्च रोजी जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. यात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून सहभागी होण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान दिले जात नाही. घोषित शाळा पात्र असूनसुद्धा त्यांना अनुदान नाही. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नेमलेल्या काही शिक्षक सेवकांना अजून जुनी पेन्शन नाही. याविरोधात कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे 11 मार्च रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

दसरा चौकातून दुपारी 12 वाजता आक्रोश मोर्चास सुरुवात होईल. बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, माळकर तिकटीमार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप होईल. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने विभागीय उपसंचालकांना निवेदन दिले जाणार आहे. 11 मार्च रोजीचे शालेय शैक्षणिक कामकाज रविवारी (दि.13) शाळा सुरू ठेवून भरून काढण्याचा निर्णय बैठकीत झाला. यावेळी शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस.डी.लाड, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षक नेते दादा लाड, मिलिंद पांगिरेकर, खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे उपस्थित होते.

Back to top button