गगनबावडा : करुळ घाटात सहा तास वाहतूक ठप्प | पुढारी

गगनबावडा : करुळ घाटात सहा तास वाहतूक ठप्प

गगनबावडा ; पुढारी वृत्तसेवा : गगनबावड्यापासून एक कि.मी. अंतरावर करुळ घाटात यू टर्न आकाराच्या वळणावर ट्रक बंद पडल्याने सुमारे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. टायर फुटल्याने ट्रक मध्येच अडकला. ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.

दरम्यान, करुळ घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. साडेदहाच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला केल्यानंतर जवळपास सहा तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

गगनबावडा – करुळ हद्दीवरील यू आकाराच्या वळणावर खराब रस्त्यामुळे पहाटे ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे घाट मार्ग बंद झाला. याबाबतची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले; तर वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने घाटात अडकून पडली होती.

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घाटात तो ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेन दाखल झाली. क्रेनच्या सहाय्याने ट्रक रस्त्यातून बाजूला करण्यात आला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. गगनबावडा घाटमार्ग नूतनीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे या घाटातील अवजड वाहतूक अन्य मार्गे वळवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना वारंवार घडणार आहेत.

Back to top button