कोल्हापूर : गांधीनगरसह इतर गावांतील नळ पाणी पुरवठा योजनेस १३७ कोटी : राजेश क्षीरसागर | पुढारी

कोल्हापूर : गांधीनगरसह इतर गावांतील नळ पाणी पुरवठा योजनेस १३७ कोटी : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गांधीनगरसह करवीर तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे गंभीर बनला आहे. हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी अनेक वर्षे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. याबाबत गेल्याच महिन्यात पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून गांधीनगरसह करवीर तालुक्यातील इतर गावातील नळ पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तब्बल १३७ कोटी २१ लाख इतक्या निधीस शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

कोल्हापूर शहराच्या वाढत्या नागरिकरणाचा परिणाम शहराशेजारील गावांवरही पडला आहे. गांधीनगर, उचगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेर्ली तामगाव, वळीवडे, कणेरी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी या गावांत नागरिकरण वाढले आहे. शहराचा विस्तार मर्यादित राहिल्याने या गावातील नागरिकरणावर भर पडत आहे. सद्या या गावांतील एकत्रित संख्या सुमारे २ लाखांच्या आसपास गेल्याने मुलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. अशातच मौजे गांधीनगर व इतर गावासाठी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. याबाबत गेल्या महिन्यात पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून या पाणी प्रश्नाची दाहकता मांडली होती. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे गांधीनगर व इतर गावे या नळ पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली असून निधी मंजुरीचा शासन आदेश पारित करण्यात आला आहे. या अनुषंगाने मौजे गांधीनगर व इतर गावे येथील ५५ लिटर दरदोई दरदिवशी क्षमतेच्या १७६५ इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधी मंजुरीमुळे गेली अनेक वर्षे गांधीनगर सह इतर गावांना भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे, असेही श्री. क्षीरसागर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

 

Back to top button